Beed: परळी-टोकवाडी रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:43 IST2025-04-08T16:43:18+5:302025-04-08T16:43:34+5:30
टोकवाडी रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झाला अपघात

Beed: परळी-टोकवाडी रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
परळी : परळी शहरातून आपल्या मूळ गावी मांडेखेलकडे निघालेल्या सुधाकर हिरामण नागरगोजे (वय ४०) या दुचाकीवरील शेतकऱ्याचा उभ्या ट्रकच्या धडकून अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास टोकवाडी रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ घडली.
सुधाकर नागरगोजे हे दुचाकीवरून मांडेखेलकडे जात असताना टोकवाडी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची दुचाकी धडकली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती परळी ग्रामीण पोलिसांनी दिली.
मंगळवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मांडेखेल येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, पोलीस अमलदार सुनील अन्नमवार व परतवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळी उपस्थित ट्रक व मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. मंगळवारी दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.