Beed: घरामागे खेळताना ओढवले संकट; अडीच वर्षांच्या चिमुरडीवर १३ वर्षीय मुलाचा अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:41 IST2026-04-02T13:40:57+5:302026-04-02T13:41:38+5:30
आठवडाभरातील दुसऱ्या घटनेने अंबाजोगाई हादरले

Beed: घरामागे खेळताना ओढवले संकट; अडीच वर्षांच्या चिमुरडीवर १३ वर्षीय मुलाचा अत्याचार
अंबाजोगाई (जि. बीड): बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात विकृतीचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर गावातीलच १३ वर्षीय शाळकरी मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ३१ मार्च रोजी घडली. याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांपूर्वीच अशाच एका घटनेत एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
घरामागील मैदानात ओढवले संकट
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित चिमुरडी तिच्या घरामागील मोकळ्या मैदानात खेळत होती. यावेळी गावातीलच १३ वर्षीय मुलाने तिला गाठून तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यामुळे चिमुरडीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या आईने १ एप्रिल रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
आठवडाभरातील दुसरी घटना; पोलीस यंत्रणा सतर्क
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या पाच दिवसांपूर्वी दोन वर्ष पाच महिने वय असलेल्या चिमुरडीवर १५ वर्षांच्या मुलाने अश्लील व्हिडीओ पाहून अत्याचार केला होता, ज्यात पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.
बाल गुन्हेगारी आणि मोबाईलचा विळखा
अल्पवयीन मुलांकडून घडणाऱ्या अशा गंभीर गुन्ह्यांमागे मोबाईलवरील अश्लील साहित्य आणि संस्कारांचा अभाव कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सलग दोन घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस आता या दोन्ही प्रकरणांतील आरोपींच्या पार्श्वभूमीची अधिक चौकशी करत आहेत.