Beed: तरुणाचा बळी गेल्यानंतर ठेकेदाराला 'जाग'; अपघातस्थळी आता लावला सुरक्षा बोर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:52 IST2025-11-20T19:52:07+5:302025-11-20T19:52:48+5:30
ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे बीड-परळी महामार्गावर मोठी दुर्घटना

Beed: तरुणाचा बळी गेल्यानंतर ठेकेदाराला 'जाग'; अपघातस्थळी आता लावला सुरक्षा बोर्ड
दिंद्रुड (बीड): बीड-परळी महामार्गावर बांधकाम करणाऱ्या गुत्तेदाराच्या बेजबाबदारपणामुळे तरुणाचा बळी गेल्यानंतर, आता 'औपचारिकता' पूर्ण करण्यासाठी अपघातस्थळी सुरक्षा बोर्ड लावण्यात आले आहेत. दिंद्रुडजवळ बांधकाम चालू असलेल्या पुलाच्या खड्ड्यात पडून निशांत सोनवणे (वय ३८. रा. कासारी) या दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह २० तास खड्ड्यात पडून राहिल्याचे उघड झाल्यानंतर, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मृत्यूनंतर ठेकेदाराला जाग
महामार्गाचे काम सुरू असलेल्या या ठिकाणी अपघात झाला तेव्हा कोणतेही सुरक्षा कवच, दिशादर्शक फलक किंवा सूचना देणारे बोर्ड नव्हते. याचाच फायदा घेऊन अंधारात काळाने निशांत सोनवणे यांच्यावर घाला घातला. "दुर्दैवी घटना घडल्यानंतर, ठेकेदाराने गुरुवारी अपघातस्थळी 'रस्ता बंद आहे, बाजूने जा' असा स्पष्ट सुरक्षा बोर्ड लावला आहे. हेच बोर्ड आणि सुरक्षा उपाययोजना आधीच केल्या असत्या, तर निशांतचा जीव वाचला असता!" असा तीव्र संताप स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
गुत्तेदारावर कारवाईची मागणी
एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्यानंतर केवळ बोर्ड लावून ठेकेदार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात घडल्याने, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे बीड-परळी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.