Beed Crime: मजुराचा खून करणारा आरोपी पाच दिवसांनंतर जेरबंद; सावळेश्वर शिवारातून घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:19 IST2026-01-12T17:18:42+5:302026-01-12T17:19:15+5:30
Beed Labour Murder: बीड शहरापासून हद्दवाढ झालेल्या अंकुशनगर भागातील साई-पंढरी लॉन्स व मंगल कार्यालयाच्या समोर मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाइपलाइन दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता.

Beed Crime: मजुराचा खून करणारा आरोपी पाच दिवसांनंतर जेरबंद; सावळेश्वर शिवारातून घेतले ताब्यात
बीड : शहरातील अंकुशनगर भागात नगरपालिकेच्या पाइपलाइनचे काम करणाऱ्या एका कंत्राटी मजुरावर गोळ्या झाडून कोयत्याने तोंडावर वार करीत निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. घटनेच्या पाच दिवसांनंतर आरोपी विशाल सूर्यवंशी यास केज तालुक्यातील सावळेश्वर शिवारातून रविवारी रात्री सात वाजता ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेसह शिवाजीनगर पोलिसांनी केली.
बीड शहरापासून हद्दवाढ झालेल्या अंकुशनगर भागातील साई-पंढरी लॉन्स व मंगल कार्यालयाच्या समोर मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाइपलाइन दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला होता. हा खड्डा हर्षद शिंदे व त्याचा एक अन्य सहकारी खोदून पाइपलाइनचे काम करत असताना त्याठिकाणी विशाल संजय सूर्यवंशी दुचाकीवरून आला. त्याने बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या चुकविल्या. मात्र, एक गोळी बरगडीत लागल्याने जीव वाचविण्यासाठी हर्षद जवळच असलेल्या एका रिकाम्या प्लॉटमधील शेडच्या पाठीमागे लपला असता, विशाल त्याचा पाठलाग करत तेथे गेला, हर्षदच्या तोंडावर वार करून खून करून दुचाकीवरून पळून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी तपासासाठी चार पथके नियुक्त केले होते. दरम्यान, आरोपी विशाल हा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातून केजकडे दुचाकीवरून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून सापळा रचून त्यास सावरगाव शिवार परिसरात ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर बीड येथे आणून आरोपीला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सोमवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलिस उपनिरीक्षक सुतळे, पोलिस अंमलदार यादव, परजने, अशपाक, राहुल शिंदे, परजने, अशपाक, मनोज वाघ, शिवाजीनगरचे एएसआय सुतार, आघाव यांच्यासह इतरांनी केली.