वर्षअखेरीस बीड एसीबीचा मोठा दणका; पाटोद्याचा वनरक्षक लाच घेताना जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:08 IST2026-01-01T18:07:26+5:302026-01-01T18:08:51+5:30
वृक्ष वाहतुकीसाठी मागितली होती लाच; बीडच्या घरातून ठोकल्या बेड्या

वर्षअखेरीस बीड एसीबीचा मोठा दणका; पाटोद्याचा वनरक्षक लाच घेताना जेरबंद
बीड : २०२५ हे वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक असताना, बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाई केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील तोडलेल्या झाडांच्या वाहतुकीसाठी एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पाटोदा वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षकाला बीडमधून अटक करण्यात आली आहे.
पाटोदा वन परिक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक दादासाहेब तेजराव येदमल याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदार हे शेतातून तोडलेल्या वृक्षांची वाहतूक करत असताना, प्रत्येक खेपेसाठी १ हजार रुपये द्यावे लागतील, असा तगादा येदमल याने लावला होता. ही लाच स्वीकारण्यासाठी त्याने एक शक्कल लढवली. येदमल याने लाचेची रक्कम स्वतः न स्वीकारता, बीड-रायमोहा फाट्यावरील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दिगांबर चौधरी याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने पैसे हॉटेल कामगाराकडे सुपुर्द केले आणि याची माहिती वनरक्षक येदमल याला दिली.
एसीबीने आधीच सापळा रचला होता, त्यामुळे पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न होताच पथकाने थेट बीड शहरातील संत भगवानबाबा चौक परिसरात असलेल्या येदमल याच्या घरातून त्याला अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, अमोल खरसाडे, प्रदीप सुरवसे, अंबादास पुरी आणि मच्छिंद्र बीडकर यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. वर्षभराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या कारवाईने शासकीय विभागात खळबळ उडाली आहे.