पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट करण्यासाठी हवा लोकसहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:02 IST2021-02-21T05:02:32+5:302021-02-21T05:02:32+5:30

५२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवकांना साकडे लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : तालुक्यातील आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट करण्यासाठी ५२ ग्रामपंचायतींसह ...

Air public participation to transform veterinary dispensaries | पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट करण्यासाठी हवा लोकसहभाग

पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट करण्यासाठी हवा लोकसहभाग

५२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : तालुक्यातील आठ पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट करण्यासाठी ५२ ग्रामपंचायतींसह सर्वांचा लोकवर्गणी अपेक्षित असून, सरपंच व ग्रामसेवकांना लोकवर्गणीसाठी साकडे घालणारे लेखी पत्र या विभागामार्फत देण्यात आले आहे.

शिरूर येथील श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची रंगरंगोटी करत नवा साज देण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सूचनेनुसार ‘सुंदर माझे कार्यालय, माझा गाव सुंदर गाव’ हे अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट करण्याच्या सूचना आहेत. ही सर्व कामे लोकवर्गणीतून करायची आहेत. यासाठी स्वतंत्र असा निधी नसल्याने आपापल्या दवाखान्याच्या हद्दीतील ग्रामपंचायतीने सहकार्याच्या भावनेतून वित्त आयोग, ग्रामपंचायत निधी अथवा अन्य मार्गाने या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा आशयाचे पत्र देण्यात आले आहे.

कायापालट अभियानातून इमारत रंगरंगोटी, शासकीय योजना माहिती फलक, पशुपालकांसाठी ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, गरजेपुरते फर्निचर, दवाखान्यात नळ जोडणी व शौचालय सुविधा, पशुवैद्यकीय सेवेसाठी अद्ययावत उपकरण खरेदी, मूलभूत सुविधा आणि दवाखान्याचे सुशोभिकरण अपेक्षित आहे. यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत, पशुपालक तसेच पशुप्रेमींनी या अभियानात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी केले आहे.

पशुसंवर्धन विभागाला आशा

तालुक्यात शिरूरसह रायमोह, घाटशिळ पारगाव, ब्रह्मनाथ, वेळंब, खालापुरी, पिंपळनेर, जाटनांदूर आणि मानूर असे आठ दवाखाने असून, या सर्वांचा कायापालट खर्च जवळपास अडीच ते तीन लाखांपर्यंत जाणार आहे. यासाठी लोकवर्गणी महत्त्वपूर्ण ठरणार असून, ती मिळेल, असा आशावाद पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: Air public participation to transform veterinary dispensaries