Beed: ऊसतोड मजुराच्या अंगावरून गेलं भरधाव वाहन; मजूरासह पाळीव श्वानाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:41 IST2026-01-27T11:40:14+5:302026-01-27T11:41:44+5:30
आष्टी तालुक्यातील तरुण ऊसतोड मजुरासह पाळीव श्वांनाचा अपघाती मृत्यू;करमाळा बायपासवर घडली दुर्दैवी घटना!

Beed: ऊसतोड मजुराच्या अंगावरून गेलं भरधाव वाहन; मजूरासह पाळीव श्वानाचा जागीच मृत्यू
- नितीन कांबळे
कडा (प्रतिनिधी): पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीला गेलेल्या एका कष्टकरी मजुरावर काळाने घाला घातला आहे. आष्टी तालुक्यातील आंबेवाडी येथील बाळासाहेब नवनाथ नरवडे (वय ३५) यांचा करमाळा बायपासवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेला त्यांचा पाळीव श्वानही या अपघातात ठार झाला असून, या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय? बाळासाहेब नरवडे हे अनगर येथील साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. २६ जानेवारी रोजी काही कामानिमित्त ते आपल्या पाळीव श्वानासह दुचाकीवरून आंबेवाडीकडे निघाले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास करमाळा बायपासवरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात बाळासाहेब आणि त्यांच्या गळ्यात साखळी असलेल्या पाळीव श्वानाचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंबाचा आधार हरपला
बाळासाहेब यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई, वडील, पत्नी आणि तीन लहान मुली असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव कमावता आधार गेल्याने नरवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी रात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर आंबेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा होत असतानाच या दुःखद बातमीने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.