हे कशाचे संकेत? देशाच्या आर्थिक राजधानीने नव्या वाहनांकडे पाठ फिरविली; मुंबईत गुढीपाडव्याच्या खरेदीत १२.८७ टक्क्यांची घसरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:20 IST2026-03-20T09:20:06+5:302026-03-20T09:20:37+5:30
मुंबईत यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीत मोठी घट झाली आहे. सुमारे ८,००० वाहनांची विक्री झाली असून विक्री १२.८७ टक्क्यांनी घसरली. वाचा सविस्तर.

हे कशाचे संकेत? देशाच्या आर्थिक राजधानीने नव्या वाहनांकडे पाठ फिरविली; मुंबईत गुढीपाडव्याच्या खरेदीत १२.८७ टक्क्यांची घसरण
गुढी पाडवा आणि दारात चारचाकी नाही तर किमान नवीन दुचाकी तरी, असा काहीसा थाट महाराष्ट्रातील लोकांचा असतो. मुंबई देखील काही त्याला परकी नाही. परंतू, यंदाच्या गुढीपाडव्याच्या वाहन खरेदीत मुंबईकरांनी सर्वांना चकीत केले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत तर पाण्यासारखा खप हवा, परंतू मुंबईकरांनी यंदा नवीन वाहनांच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे संपूर्ण जगावर अनिश्चिततेचे सावट आहे. घरांच्या किंमती गगणाला भिडलेल्या आहेत. महागाईने सामान्य माणसांचेच नाही तर मुंबईत काम करणाऱ्या नोकरदार वर्गाचे देखील कंबरडे मोडले आहे. अशातच गुढी पाडव्याला ऑटो सेक्टरलाही मोठा धक्का देणारे संकेत मिळत आहेत. या गुढीपाडव्याला मुंबईत वाहन खरेदीत तब्बल १२.८७ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली असून, सुमारे ८,००० वाहनांची विक्री झाली आहे.
विक्रीच्या आकड्यात मोठी घसरण
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईकरांनी वाहन खरेदीकडे काहीसा पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईतील विविध आरटीओ (RTO) कार्यालयांतून मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, नोंदणी झालेल्या वाहनांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.
काय आहेत या मंदीची कारणे?
ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या घसरणीमागे अनेक कारणे असू शकतात. वाहनांच्या वाढत्या किमती आणि सुट्या भागांच्या दरात झालेली वाढ यामुळे ग्राहक खरेदीचा विचार लांबणीवर टाकत आहेत. वाढती महागाई आणि कर्जाचे उच्च व्याजदर यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांनी या मुहूर्तावर मोठी गुंतवणूक करणे टाळल्याचे दिसते. काही लोकप्रिय मॉडेल्ससाठी असलेला दीर्घ वेटिंग पिरीयडदेखील ग्राहकांच्या उत्साहावर विरजण घालणारा ठरला आहे. या घसरणीमुळे ऑटोमोबाईल डीलर्समध्ये चिंतेचे वातावरण असून, आगामी सणासुदीच्या काळात देखील हेच सावट असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.