Water tax in Pune 1450, Nashik 1200 so why 4050 in Aurangabad ? | पुण्यात १४८०, नाशिकला १२०० औरंगाबादेत पाणीपट्टी ४०५० का ?
पुण्यात १४८०, नाशिकला १२०० औरंगाबादेत पाणीपट्टी ४०५० का ?

ठळक मुद्देमनपासमोर नागरिकांचे निदर्शने खासगीकरण रद्द झाल्यानंतरही पाणीपट्टी मात्र कायमच वाढलेली आहे.

औरंगाबाद : पुण्यात दररोज नागरिकांना पाणीपुरवठाकरण्यात येतो. पाणीपट्टी फक्त १४८० रुपये वसूल करण्यात येते. नाशिक शहरातही महापालिका दररोज पाणीपुरवठा करून नागरिकांकडून फक्त १२०० रुपये पाणीपट्टी घेत आहे. औरंगाबादेत आठवड्यातून एकदा पाणी देण्यात येते. त्यानंतरही पाणीपट्टी तब्बल ४०५० रुपये वसूल करण्यात येते. या अवाढव्य पाणीपट्टीच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी मनपासमोर सामाजिक मंच व पाणीपुरवठा नागरी कृती समितीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली.

निदर्शनानंतर शिष्टमंडळाने महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, महानगरपालिकेने २०१२ मध्ये समांतर जलवाहिनीसाठी पाणीपुरवठ्याचे खासगीकरण केले. कंत्राट एस.पी.एम.एल., तसेच सिटी वॉटर युटीलिटी कंपनीला दिले. नागरिकांचा प्रखर विरोध लक्षात घेता महापालिकेने हे खासगीकरण नंतर रद्द केले. दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा एवढा विस्कळीत झाला की, दोन दिवसाआड, नंतर तीन दिवसाआड, चार दिवसाआड करीत आज पाणीपुरवठा सहा ते सात दिवसांआड झाला आहे. दुसरीकडे पाणीपट्टी १८०० रुपयांवरून ४०५० रुपयांवर नेण्यात आली. खासगीकरण रद्द झाल्यानंतरही पाणीपट्टी मात्र कायमच वाढलेली आहे. मनपाकडून करण्यात आलेली दरवाढ रद्द करावी अशी मागणीही निवेदनात केली आहे. 

शिष्टमंडळाने महापौरांसोबत चर्चा करताना नमूद केले की, राज्यात एवढी प्रचंड पाणीपट्टी कोणत्याच शहरात नाही. महापालिकेने या गंभीर प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात सामाजिक मंचचे प्रा. विजय दिवाण, सुभाष लोमटे, अजमल खान, मेराज सिद्दीकी, अण्णा खंदारे, भीमराव बनसोड, बुद्धिनाथ बराळ, सिद्धार्थ बनसोड, डॉ. सुनीती धारवाडकर, सुलभा खंदारे, मंगल खिंवसरा यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Web Title: Water tax in Pune 1450, Nashik 1200 so why 4050 in Aurangabad ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.