दोन लाखांवर मराठे एकवटणार

By Admin | Updated: September 6, 2016 00:10 IST2016-09-06T00:10:11+5:302016-09-06T00:10:11+5:30

कोपर्डी प्रकरणाच्या निषेधासह मराठा आरक्षणाची मागणी बुलंद करण्यासाठी अमरावतीमध्ये २२ सप्टेंबर रोजी मराठ्यांचा महामोर्चा निघणार आहे.

Two lakhs of Marathas will be gathered | दोन लाखांवर मराठे एकवटणार

दोन लाखांवर मराठे एकवटणार

२२ ला शक्तीप्रदर्शन : जातीचा नव्हे प्रवृत्तीचा विरोध 
अमरावती : कोपर्डी प्रकरणाच्या निषेधासह मराठा आरक्षणाची मागणी बुलंद करण्यासाठी अमरावतीमध्ये २२ सप्टेंबर रोजी मराठ्यांचा महामोर्चा निघणार आहे. हा मूकमोर्चा परभणीप्रमाणे रेकॉर्डब्रेक होण्यासाठी मराठे एकवटले असून मोर्चाचे सूक्ष्म नियोजन केले जात आहे. या मोर्चात दोन लाखांपेक्षा अधिक मराठे सहभागी होणार आहेत.
उल्लेखनीय म्हणजे या मोर्चाला कुठलाही राजकीय किवा अराजकीय चेहरा नाही. केवळ आणि केवळ मराठा म्हणून यात लाखो मराठे सहभागी होणार आहेत. या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी रविवार ४ सप्टेंबर रोजी स्थानिक अभियंता भवनात पहिली बैठक घेण्यात आली. बैठकीला शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना रोखण्यासाठी कडक कायदे करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी मराठे २२ सप्टेंबरला जिल्हाकचेरीवर धडकणार आहेत. कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणाने मराठा पेटून उठला. उरात पेटलेली ती आग मोर्चाच्या स्वरूपात प्रकटणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी तालुकास्तरावर समिती नेमण्यात आल्या आहेत. सांघिक नेतृत्वात सोशल मीडियाचा आधार घेत अगदी गावस्तरावर मराठा समूहाला एकवटण्याचे शिवधनुष्य हाती घेण्यात आले आहे. २२ सप्टेंबरच्या या मोर्चात सुमारे दोन लाख मराठा सहभागी होतील, अशाप्रकारचे सूक्ष्म नियोजन विविध आघाड्यांवर केले जात आहे. नियोजनाची पुढील बैठक रविवार ११ सप्टेंबरला होणार आहे. या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असावा, या दृष्टीनेही प्रयत्न केले जात आहेत. मराठयांचा हा मोर्चा कुण्या जातीविरोधात नव्हे तर प्रवृत्तीच्या विरोधात काढला जाणार आहे.

Web Title: Two lakhs of Marathas will be gathered