ऑनलाईन शिक्षणाबाबत वेळेचे बंधन कुणावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:00 AM2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:02+5:30

जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदेसह खासगी शाळांनाही ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत नियमावली लागू करण्यात आली. मात्र, खासगी शाळा विद्यार्थ्यांना दिवसभर ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने मोबाईलवर व्यस्त ठेवत असल्याची पालकांची ओरड आहे. सतत मोबाईल हाताळल्याने पूर्वमाध्यमिकच्या विद्यार्थ्यांचे डोके सुन्न होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून व्यक्त होत आहेत.

Time constraint on online education? | ऑनलाईन शिक्षणाबाबत वेळेचे बंधन कुणावर?

ऑनलाईन शिक्षणाबाबत वेळेचे बंधन कुणावर?

Next
ठळक मुद्देशिक्षण विभागाला तक्रारींची प्रतीक्षा : मुलांना मोबाईलमुळे डोळ्यांचे विकार, डोक्याचे आजार होण्याची दाट शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गामुळे ‘लॉकडाऊन’ आहे. शाळा, महाविद्यालयांना सुटी आहे. शैक्षणिक सत्राची रूढ सुरुवात कधी होणार, याची शाश्वती नाही. मात्र, शाळांमधून ऑनलाईन शिक्षणाचा सुळसुळाट सुरू झाला आहे. खरे तर याबाबत आलेल्या शासननिर्णयानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. तथापि, खासगी शाळांमधून दिवसभर विद्यार्थ्यांना मोबाईलवर गुंतवून ठेवले जात आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
२६ जूनपासून शाळा सुरू झाल्या नाहीत. कोविड-१९ मुळे त्या तूर्तास सुरू होण्याचे संकेत नाहीत. यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांना घरीच शिक्षण मिळावे, यासाठी ऑनलाईन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषदेसह खासगी शाळांनाही ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत नियमावली लागू करण्यात आली. मात्र, खासगी शाळा विद्यार्थ्यांना दिवसभर ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने मोबाईलवर व्यस्त ठेवत असल्याची पालकांची ओरड आहे.
सतत मोबाईल हाताळल्याने पूर्वमाध्यमिकच्या विद्यार्थ्यांचे डोके सुन्न होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून व्यक्त होत आहेत. ती विद्यार्थ्यांसह पालकांनाही डोकेदुखी ठरली आहे. ऑनलाईन शिक्षण किती वेळ, याबाबत बंधने पाळली जाण्याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
मानसिक तणाव अन् डोळ्यांवर ताण
शाळेत वर्गातून मिळणारे शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण यात मोठी तफावत आहे. मोबाईलवर ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणाव आणि डोळ्यांवर ताण येण्याची भीती महापालिका वैद्यकीय अधिकारी विशाल काळे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ऑनलाईन शिक्षण हे एकट्यालाच मोबाईलवर घ्यावे लागते. त्यामुळे आपसूकच मानसिक ताण येतो. विद्यार्थ्यांची चीडचीड वाढीस लागते. विद्यार्थ्यांना मन मोकळे करता येत नाही. अभ्यासात एकाग्रता राहत नाही. सतत मोबाईल हाताळल्याने मानसिक तणाव येत असल्याचे डॉ. विशाल काळे म्हणाले.

शासननिर्णयानुसार एक, दोन वा तीन तास ऑनलाईन शिक्षण देणे अपेक्षित आहे. जादा वेळेसंदर्भात पालकांची तक्रार आल्यास सदर शाळांवर कारवाई करता येईल.
- प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद

दिवस उजाडताच शाळेतून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज येतो. आयडी क्रमांक दिला जातो. त्यानंतर पाल्यांना दिवसभर मोबाईलमध्ये मग्न राहावे लागतात. मुले घरी कंटाळून गेली आहेत.
- प्रगती बांबोडे, पालक, जेल क्वार्टर रोड

Web Title: Time constraint on online education?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.