मोर्शी तालुक्यात हिरव्या झाडांची कत्तल

By Admin | Updated: October 15, 2015 00:21 IST2015-10-15T00:21:20+5:302015-10-15T00:21:20+5:30

स्थानिक पाट नदीच्या काठावरील वृक्षांची दिवसा ढवळया राजरोसपणे कत्तल करण्यात आली.

Slaughter of green trees in Morsi taluka | मोर्शी तालुक्यात हिरव्या झाडांची कत्तल

मोर्शी तालुक्यात हिरव्या झाडांची कत्तल

चौकशी सुरु : पाट नदीकाठावरील प्रकार
मोर्शी : स्थानिक पाट नदीच्या काठावरील वृक्षांची दिवसा ढवळया राजरोसपणे कत्तल करण्यात आली. या घटनेची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
मनिमपूर ते भीवकुंडी हा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बनविला जात आहे. सध्या या रस्त्याची आखणी झालेली आहे. रस्त्याच्या बाजूने पाट नावाची नदी वाहते. रस्त्याच्या आखणीत वृक्षांचा अडथळा येत नसूनही चक्क नदीच्या काठावरील मोठमोठया हिरव्याकंच झाडांची कत्तल केली गेली. ही माहिती एका जागरूक नागरिकाने व्हॉट्स अ‍ॅपवर कत्तलीचे छायाचित्र पाठवून उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना दिली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने तलाठयाला घटनास्थळी पाठवून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत घटनास्थळावरून कापलेली झाडे हलवू नयेत, असेही त्यांनी बजावले. दरम्यान मनिमपूर-भीवकुंडी रस्ता निर्मितीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या मते झाडांची कत्तल ही वरुड तालुक्यातील लाकूड तस्कराने केली आहे. रस्ता निर्मितीत अडथळा ठरत नसूही या हिरव्यागार झाडांची कत्तल का झाली? हा खरा प्रश्न आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून करुन या झाडांची कत्तल करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. वृक्षलागवड, वृक्षसंवर्धनासाठी युध्दस्तरावर योजना राबवित आहे. मात्र, दुसरीकडे हिरव्यागार वृक्षांची कत्तल बेधडकपणे केली जात आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून चौकशी अहवालाकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

एकीकडे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविल्या जात असतानाच दुसरीकडे झाडांची अवैधरीत्या कत्तल केली जात आहे. ही गंभीर बाब असून या प्रकरणी आपण तलाठ्याकडून अहवाल मागविला असून अहवाल प्राप्त होताच संबंधितांविरुध्द कठोर कारवाई केल्या जाईल.
- ललितकुमार वऱ्हाडे
उपविभागीय अधिकारी

Web Title: Slaughter of green trees in Morsi taluka