आरोग्य सहायकांच्या बदली यादीत घोळ

By Admin | Updated: May 22, 2014 23:23 IST2014-05-22T23:23:09+5:302014-05-22T23:23:09+5:30

जिल्हा परिषद : दोषींवर निलंबन कारवाईचे संकेत, बदल्यांची फेरप्रक्रिया

List of health assistants in the list | आरोग्य सहायकांच्या बदली यादीत घोळ

आरोग्य सहायकांच्या बदली यादीत घोळ

अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील बदलीपात्र आरोग्य सहायकांच्या बदली यादीत घोळ झाल्याचे उघडकीस आले. या मुद्यावर आक्षेप येताच मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी फेरबदली प्रक्रिया घेऊन घोळ करणार्‍या जिल्हा परिषद आरोग्य विभागातील तीन कर्मचार्‍यांवर निलंबन कारवाईचे संकेत दिले आहेत. जिल्हा पारिषदमध्ये रविवारपासून विविध विभागातील बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार २० मे रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, सेविका, औषधी निर्माता, पर्यवेक्षक आणि आरोग्य सहायक महिला व पुरुष याप्रमाणे बदल्यांची प्रक्रिया करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. बदलीसाठी पात्र पुरूष आरोग्य सहायकांच्या अंतिम बदली यादीवर जिल्हा आरोग्य अधिकारी आर.जे.पराडकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी स्वाक्षरी करुन यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, प्रत्यक्ष बदल्यांची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अधिकार्‍यांसमोर अंतिम मंजूर यादीऐवजी नावे गहाळ असलेली यादी ठेवण्यात आली. मेळघाटातून बदलीवर येणार्‍या एका कर्मचार्‍याला पद स्थापनेसाठी जागा नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, या कर्मचार्‍याने अमरावती मुख्यालयात व तालुक्यात एकाच ठिकाणी अनुक्रमे १३, १५ आणि २० वर्ष सेवा करणार्‍या तीन कर्मचार्‍यांची नावेच यादीत नसल्याची बाब वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. अधिकार्‍यांनी लगेच याबाबीची पडताळणी केली असता यादीत अमरावती मुख्यालय व तालुक्यात तीन आरोग्य सहायक एकाच ठिकाणी कित्येक वर्षांपासून कार्यरत असल्याचे दिसून आले. या गंभीर प्रकाराने मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी बदली प्रक्रिया थांबविली. यादीतील गंभीर चूूक लक्षात येताच त्यांनी आरोग्य विभागातील तीन दोषी कर्मचार्‍यांना गुरुवारी दालनात बोलावून खडसावले. इतकेच नव्हे तर या तिघांच्या निलंबन कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख व जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना दिले. या मुद्यावर बरीच चर्चा होऊन तत्काळ सुधारित यादी तयार करण्याचे व बुधवारी थांबविण्यात आलेली आरोग्य सहायकांची बदली प्रक्रिया नव्याने पुन्हा गुरुवारी घेण्यात आली. या बदली यादीतून क्लिनचीट मिळविणार्‍या कर्मचार्‍यांची बदली मेळघाट येथे करण्यात आली. आरोग्य सहायकांच्या बदल्यांची एकूण ११ प्रकरणे होती. यापैकी ५ विनंती आणि ६ प्रशासकीय बदल्यांची कारवाई पूर्ण करण्यात आली.

Web Title: List of health assistants in the list