व्हिनस प्लाझा येथील हॉटेलच्या सांडपाण्यामुळे जगणे असह्य

By Admin | Updated: September 23, 2015 00:22 IST2015-09-23T00:22:24+5:302015-09-23T00:22:24+5:30

स्थानिक शेगाव नाका चौकातील व्हिनस प्लाझा संकुलातील एका हॉटेलमधून निघणाऱ्या सांडपाण्याने दुकानदारांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे.

It is unbearable to live by the sewage of Venus Plaza Hotel | व्हिनस प्लाझा येथील हॉटेलच्या सांडपाण्यामुळे जगणे असह्य

व्हिनस प्लाझा येथील हॉटेलच्या सांडपाण्यामुळे जगणे असह्य

दुकानदारांची पोलिसात तक्रार : महापालिका आयुक्तांना निवेदन सादर
अमरावती : स्थानिक शेगाव नाका चौकातील व्हिनस प्लाझा संकुलातील एका हॉटेलमधून निघणाऱ्या सांडपाण्याने दुकानदारांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे. कुजलेले अन्न, सांडपाणी, डांसाचा प्रादुर्भावामुळे डेंग्यूसारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या हॉटेल चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार तर महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करुन मरणयातनेतून बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
८० गाळे असलेल्या या संकुलात हॉटेलमधून निघणाऱ्या सांडपाणी, टाकाऊ पदार्थ, कुजलेला भाजीपाला, तेलाचे आवरण अशा विविध बाबींमुळे संकुलातील किमान ५० गाळेधारक त्रस्त झाले आहेत. सतत पसरणाऱ्या दुर्गंधीने दुकानदाराचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेगळा दर्प सतत या संकुलात राहात असल्यामुळे ग्राहक देखील या संकुलात येण्याचे टाळतात, असे तक्रारकर्त्या दुकानदारांचे म्हणणे आहे. या संकुलातून निघणाऱ्या सांडपाण्याचा गाळ साचल्याने मुख्य नाली अवरुद्ध झाली आहे. अशातच पावसाचे पाणी साचून राहिल्याने डासांचे थवे घोंगावणे ही नित्याचीच बाब झाली आहे. अनेकदा पंपाद्वारे पाणी बाहेर काढण्याचा प्रसंग दुकानदारांवर ओढवत आहे. या संकुलातील दुकानदार नियमित मालमत्ता करधारक असून महापालिकेत तक्रार दिल्यानंतरही या हॉटेल संचालकाविरुद्ध कारवाई होत नसल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. या संकुलातील पार्किंग व्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे. नालीतून सांडपाणी बाहेर पडत नसल्याने ही परिस्थिती येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता असल्याचे दुकानदारांनी तक्रारीत नमूद केले आहे.
विलास राऊत, विलास विरूळकर, अतुल होले, मनोज जेठानी, देवीलाल शर्मा, प्रशांत चौधरी, आर. व्ही. मिरगे, आशिष गायकवाड, संजय इंगोले, संतोष काळे, जगदीश डोंगरे, प्रवीण काळे, सागर फणसे, राकेश फणसे, एस. ए. विंचुरकर, विजय लोखंडे या दुकानदारांनी हॉटेल संचालकाविरुद्ध धाव घेतली आहे. संकुल परिसरात आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनातून म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: It is unbearable to live by the sewage of Venus Plaza Hotel