अमरावती : गुटखा माफियांमधील अंतर्गत वादाचा भडका आता रस्त्यावर येऊ लागला असून, आपापसांतील संघर्षातून कोट्यवधींचा माल पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक खळबळजनक प्रकार मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. गुटखा तस्करामधील 'सेटलमेंट' फिस्कटल्याने अखेर १०० पोते प्रतिबंधित गुटखा असलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला असून, याची किंमत अंदाजे एक ते दीड कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.
या कारवाईची पटकथा एखाद्या चित्रपटाला साजेशी आहे. एका ट्रक मधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक वजा तस्करी होत असल्याची टीप कंट्रोल रूमच्या 'डायल ११२' ला देण्यात आली. लोकेशन ट्रेस केले असता ते चांदूर रेल्वे हद्दीतील मालखेड-पळसखेड रोडवर असल्याचे समजले. त्यामुळे डायल 112 च्या वतीने ती माहिती चांदुर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. तत्काळ हालचाली करत पोलिसांनी या मार्गावर सापळा रचला आणि संशयास्पद ट्रक ताब्यात घेतला. प्राथमिक पाहणीत ट्रकमध्ये १०० पोते प्रतिबंधित गुटखा आढळला असून, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकृत पंचनामा आणि मोजदाद सुरू होणार आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हा ट्रक कारवाईपूर्वीच काही जणांनी अडवला होता. तिथे मोठ्या रकमेची मागणी करत तो लुटण्याचा किंवा तडजोड करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, व्यवहार न जमल्याने 'मी नाही तर तूही नाही' या भूमिकेतून थेट कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली. यावरून अमरावती जिल्ह्यातील गुटखा तस्करांमध्ये सध्या 'कोल्ड वॉर' सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. सहा महिन्यांपूर्वी शिरखेड पोलिसांनी केलेल्या ८७ लाखांच्या कारवाईतही असाच 'तडजोड न झाल्याचा' पॅटर्न पाहायला मिळाला होता.
नऊ मे रोजी कारंजा लाड येथे महामार्ग पोलिसांनी सव्वा कोटींचा गुटखा जप्त केला होता, जो अमरावतीमधील 'जावेद' नामक व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या मोठ्या धक्क्यानंतर आता ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा माल अमरावती शहरातून तालुक्याकडे जात होता की उलट प्रवास करत होता, याचा उलगडा चालकच्या जबाबानंतरच होणार आहे. सध्या घटनास्थळी चांदूर रेल्वे पोलिसांसह एलसीबीचे पथक तळ ठोकून आहे.
Web Summary : Internal disputes among gutka mafias are escalating, leading to police seizures. A truck carrying ₹1-1.5 crore worth of banned gutka was seized after a settlement failed. The information was leaked to the police after the deal fell apart, exposing a 'cold war' among gutka smugglers in Amravati.
Web Summary : गुटखा माफियाओं के बीच अंदरूनी झगड़े बढ़ रहे हैं, जिससे पुलिस जब्ती हो रही है। एक ट्रक जिसमें ₹1-1.5 करोड़ का प्रतिबंधित गुटखा था, समझौता विफल होने के बाद जब्त किया गया। सौदा टूटने के बाद पुलिस को जानकारी लीक कर दी गई, जिससे अमरावती में गुटखा तस्करों के बीच 'शीत युद्ध' उजागर हो गया।