श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:10+5:302021-02-05T05:33:10+5:30

पालकमंत्री, रिद्धपूर ते तिवसा राज्य मार्गाचा विकास रिद्धपूर : महानुभावपंथीयांची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेचे जन्मस्थळ ...

Independent plan for development of Shrikshetra Ridhpur | श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा

श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा

पालकमंत्री, रिद्धपूर ते तिवसा राज्य मार्गाचा विकास

रिद्धपूर : महानुभावपंथीयांची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेचे जन्मस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूरच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा करण्यात येईल, अशी घोषणा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी केली.

पालकमंत्री ठाकूर यांच्या हस्ते रिद्धपूर ते तिवसा राज्य मार्ग ३०० चे महामार्गाच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार देवेंद्र भुयार, सरपंच गोपाल जामठे, जिल्हा परिषद सदस्य दत्ता ढोमणे, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, उपसरपंच सबीर, तात्यासाहेब मेश्राम, रमेश काळे, पंकज हरणे, मनोज टेकाडे, धनंजय तट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, केवळ रस्त्याचा विकास नव्हे, इतरही विविध विकासकामांसाठी स्वतंत्र आराखडा करण्यात येईल. आशियाई विकास बँक अर्थसाहाय्यित रिद्धपूर-तिवसा राज्य मार्ग ३०० ची सुधारणा बांधकाम होणार आहे. त्यासाठी १६१ कोटी मंजूर करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, गावाच्या ठिकाणी सिमेंटचा रस्ता राहणार आहे, वीज पाणी व इतर सेवा वाहिन्यांसाठी विशेष पाईप लाईन राहणार, एसटी बससाठी विशेष थांबा व शेल्टर राहणार आहे.

श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधर स्वामी हे कुण्या एका धर्म-पंथाचे नसून, ते सकलांचे आहेत. म्हणून तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा सर्वसमावेश असला पाहिजे, अशी मागणी याप्रसंगी आ. देवेंद्र भुयार यांनी केली.

--------------

स्वतंत्र आराखडा

रिद्धपूर विकास आराखडा सर्वांगीण व सविस्तर झाला पाहिजे. ज्या-ज्या ठिकाणी गोविंदप्रभू राहिले, त्या-त्या सर्व ठिकाणांचा विकास व्हावा, या हेतूने समग्र तपशिलासह आराखडा तयार करण्यात येणार आहे, असेही पालकामंत्र्यांनी सांगितले.

---------------

Web Title: Independent plan for development of Shrikshetra Ridhpur