अपंग संस्था शिक्षक, कर्मचाऱ्यांची धडक

By Admin | Updated: May 14, 2015 00:05 IST2015-05-14T00:05:26+5:302015-05-14T00:05:26+5:30

जिल्हा परिषदेच्या अपंग शाखेत एकही लिपिक नसल्याने प्रशासकीय कामकाजात अडथळे येत आहेत.

Handicapped teacher, employees strike | अपंग संस्था शिक्षक, कर्मचाऱ्यांची धडक

अपंग संस्था शिक्षक, कर्मचाऱ्यांची धडक

निवेदन : समाजकल्याण अपंग शाखेत कर्मचारी नियुक्तीची मागणी
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अपंग शाखेत एकही लिपिक नसल्याने प्रशासकीय कामकाजात अडथळे येत आहेत. त्यामुळे येथे दोन लिपिक नियुक्त करावे व अन्य मागण्यांसाठी बुधवारी महाराष्ट्र राज्य अपंग संस्था शिक्षक व कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी विविध मागणीचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांना देण्यात आले.
अपंग संस्था शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या अपंग शाखेत लिपिक नसल्याने या विभागात प्रशासकीय कामात विलंब होत आहे.अंध, मूकबधिर, मतिमंद, व शारीरिक अपंग प्रवर्गातील सुमारे पन्नास शाळा जिल्ह्यात आहेत.अशातच अपंगांचे प्रमाणपत्र वितरण, सुमारे ४५० कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन, वेतनेत्तर परिपोषण, अनुदान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्ययावत ठेवणे, अन्य शासकीय योजना राबविणे आदी कामे या विभागातून केली जातात.
ही कामे केवळ एक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, सहायक सल्लागार करू शकणार नाहीत. त्यामुळे येथील प्रशासकीय कामाचा ताण लक्षात घेता या ठिकाणी दोन लिपिक नियुक्त करावीत. जणेकरून प्रशासकीय कामाला गती येऊन कामेही विहीत वेळेत पूर्ण होतील.
या दृष्टीने नियोजन करावे, अशी मागणी अपंग शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सीईओंना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप धोटे, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोहोड, अरविंद राऊत, सचिव गजानन गोस्वामी, जयंत तिखिले, नवनाथ इंगोले, सुनीता नाचणकर, कृष्णकुमार तोमर, किशोर वैद्य, आर ए मस्के, पवन रामावत, अभिजित जोशी उपस्थित होते. दरम्यान या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन सीईओ ने दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Handicapped teacher, employees strike