५६ हजार हेक्टरमधील पिके धोक्यात

By Admin | Updated: August 21, 2014 23:33 IST2014-08-21T23:33:17+5:302014-08-21T23:33:17+5:30

तालुक्यात २४ दिवसांपासून पाऊस नसल्याने नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम खरिपाच्या सर्वच पिकांवर जाणवू लागला आहे. यामुळे तालुक्यातील ५६ हजार ३९३ हेक्टरवरील खरिपाची पिके मोठ्या

In the danger of crops in 56 thousand hectares | ५६ हजार हेक्टरमधील पिके धोक्यात

५६ हजार हेक्टरमधील पिके धोक्यात

पावसाची दडी : संत्रा, कापूस, सोयाबीन, तुरीवर अवकळा
सुरेश सवळे - चांदूरबाजार
तालुक्यात २४ दिवसांपासून पाऊस नसल्याने नैसर्गिक परिस्थितीचा परिणाम खरिपाच्या सर्वच पिकांवर जाणवू लागला आहे. यामुळे तालुक्यातील ५६ हजार ३९३ हेक्टरवरील खरिपाची पिके मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. यंदा खरिपाच्या उत्पादनात ८० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका तालुक्यातील ४३ हजार ५८५ शेतकऱ्यांना बसणार आहे.
यावर्षी पावसाला एक महिना उशिराने सुरूवात झाली. त्यामुळे पेरणीचा काळ ३० दिवस पुढे लोटला गेला. पावसाला सुरूवात झाल्यानंतर ८ ते २० जुलै या कालावधीत तालुक्यात पेरणीला सुरूवात झाली. पेरणी झालेल्या शेतात नुकतीच बाळ रोपे तयार झाली असतानाच २४ ते २७ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीने पिकांना चांगलाच फटका बसला. यातून पिके कशीबशी सावरायला सुरूवात झाली असतानाच २८ जुलैपासून तर आजतागायत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. पावसाअभावी पिके व्हेंटीलेटरवर असतानाच अति उष्णतेचा शॉक या बाळ रोपांना बसला. त्यामुळे पिकाच्या नैसर्गिक वाढीच्या प्रक्रियेत बदल घडून आला. कमी कालावधीच्या पिकांमध्ये शाखीय वाढ थांबूून प्री-मॅच्युरिटीची स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे सोयाबिनचे पीक अकाली फुलोरावर आले आहे. याचा सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम जाणवणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सद्यस्थितीत तालुक्यातील २१ हजार ९० हेक्टरवरील खरिपाच्या सोयाबीन पिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कपाशीची स्थिती पावसाच्या ताणानंतरही काही प्रमाणात ठीक असली तरी उत्पादनावर मोठा परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे १५ मे ते ३० जूनपर्यंत पेरलेल्या कपाशीपेक्षा जुलै महिन्यात पेरलेल्या कपाशी पिकापासून मिळणारे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी होते. त्यात पावसाने दिलेला ताण व अतिउष्णतामानामुळे खरिपाच्या कोरडवाहू पिकांमध्ये कपाशीच्या फळ-फांद्यांची निर्मितीच झाली नाही. त्यामुळे कपाशीच्या एकूण उत्पादनापैकी शेतकऱ्यांच्या हाती केवळ २५ ते ३० टक्केच उत्पादन येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हवामानाच्या बदलाचा ८ हजार हेक्टरवरील संत्रा पिकालासुध्दा फटका बसला असून यंदा संत्रामृग बहर फुटलेलाच नाही. तर आंबिया बहरावर पाण्याच्या ताणाचा व उष्णतेचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात फळांची गळती होत आहे. त्यामुळे संत्रा पिकांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. तालुक्यात सर्वात विदारक स्थिती ८ हजार ४०७ हेक्टरवरील तूर पिकांची झालेली आहे. २४ ते २७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकाला मर रोगाची लागण होऊन ८० टक्के पीक अक्षरश: जळून गेले आहे. त्यानंतर पेरलेल्या तुरीला निसर्गाने व वन्यप्राण्यांनी जगूच दिले नाही.
उर्वरित तुरीच्या पिकांपासून उत्पादनापेक्षा गुरांच्या वैरणाचीच निर्मिती होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना उत्पादन आणि भाव यात दिलासा देणारे एकमेव तुरीचे पिकही शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. मूग, उडीद व इतर पिके पूर्णत: कोमात गेली असून त्यापासून मिळणाऱ्या उत्पादनाची आशाच शेतकऱ्यांनी सोेडली आहे.

Web Title: In the danger of crops in 56 thousand hectares