कोरोना : आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:46+5:30

आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांना ‘इन्सिडेंट कमांडर’ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांना ‘सनियंत्रक’ घोषित करण्यात आले आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांच्या जबाबदाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केल्या आहेत.

Corona: Disaster Management Act applicable | कोरोना : आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

कोरोना : आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : शासकीय विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित; तपोवन, पीडीएमसी-गुरू कुंज येथील रू ग्णालयांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये व संशयित रुग्णांमुळे आपत्तीची स्थिती उद्भवू नये, यासाठी या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष शैलेश नवाल यांनी गुरुवारी तसा आदेश जारी केला.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांना ‘इन्सिडेंट कमांडर’ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांना ‘सनियंत्रक’ घोषित करण्यात आले आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांच्या जबाबदाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित केल्या आहेत. यामध्ये पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक व अधिनस्थ अधिकाऱ्यांद्वारे परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून, ज्या हॉटेल वा नातेवाइक यांच्याकडे ते मुक्कामाला आहेत, त्यांची एकत्रित माहिती जिल्हा रुग्णालय व संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने कोरोनाविषयी जागृती करणे, गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याविषयी आयोजकांना अवगत करणे आणि अधिनस्थ कर्मचाºयांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करून जिल्हा रुग्नालयाशी समन्वय ठेवण्याचे निर्देश आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लघुकृती प्रमाणित कार्यपद्धती तयार करावी. आरोग्य विभागाचे मार्गदर्शक पुस्तिकेचे वितरण करावे तसेच स्वतंत्र वैद्यकीय पथक पूर्णवेळ तयार ठेवावे. संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी. आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करावा. कोरोंटाइन व आयसोलेशन युनिट स्थापन करून स्वतंत्र नोडल अधिकाºयांची नियुक्ती करावी तसेच दैनंदिन प्रगती अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश आहेत.
महापालिका आयुक्त व सर्व मुख्याधिकाºयांनी वॉर्डनिहाय स्वच्छता ठेवावी. अधिनस्थ रुग्णालयात कोरोंटाइन व आयसोलेशन युनिट स्थापन करावे. मदत केंद्र व माहिती केंद्र तात्काळ सुरू करून २४ तास कार्यान्वित ठेवावे व यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाºयाची नियुक्ती करण्याचे निर्देश आहेत. जिल्हा परिषदेच्या सीईओंनी अधिनस्थ पीएचसीमार्फत जागृती करावी. ग्रामस्तरावर स्वच्छता ठेवावी व केरकचरा साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्वतंत्र वैद्यकीय पथक नोडल आॅफिसरची नियुक्ती करावी तसेच अंगनवाडी व शाळांमध्य याविषयीचे प्रबोधन करण्याचे निर्देश आहेत.

औषधांची साठेबाजी केल्यास कारवाई
औषधविक्रेत्यांनी जादा दराने मास्क विक्री, औषधांची साठेबाजी व संसर्गाबाबत चुकीचे समज पसरविल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ इन्सिडेंट कमांडर यांना माहिती द्यावी व आवश्यक ती कारवार्ई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. वेळोवळी सर्व औषधविक्रेत्यांची तपासणी करावी व त्यांच्यासोबत समन्वय बैठक घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.

खासगी डॉक्टरांची सेवा व साहित्याचे अधिग्रहण
या कायद्यान्वये खासगी डॉक्टरांची सेवासह हॉस्पिटलमधील साधनसामग्री अधिग्रहीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांनी सीएस व डीएचओंना दिले आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कलम ५१ अन्वये कारवार्ई होईल. खासगी रुग्णालये सहकार्य करीत नसल्यास त्यांचेवर योग्य ती कारवाई करावी व जिल्ह्यातील विविध रुग्णालये व हॉस्पिटल यांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत.

टोल फ्री क्रमांक १०४ कार्यान्वित
यासंबंधाने टोल फ्री क्रमांक १०४ कार्यान्वित करण्यात यावा व खात्री करावी तसेच राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाच्या ०२०-१६१२७३९४ व राष्ट्रीय कॉल सेंटरच्या ९१-११-२३९७८०४६ या क्रमांकाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे निर्देश सीएस व डीएचओंना देण्यात आले. विमानतळावरची माहिती आरोग्य विभागाला प्राप्त होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन निरीक्षणाखाली ठेवावे व याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश आहेत.

समाज माध्यमांवर अफवा; सायबर सेलद्वारे कारवाई
समाज माध्यमांवर कोरोनाबाबत अफवा, गैरसमज पसरविणाºयांवर आता सायबर सेलमार्फत कारवाई केली जाईल. या अफवांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश सीपी व एसपी यांना देण्यात आले. याशिवाय औद्योगिक सुरक्षा बल संचालक, आरोग्य संचालक, शिक्षणाधिकारी, रेड क्रॉस, लायन्स क्लब, रोटरी क्लब, विपश्यना केंद्र व्यवस्थापक व सेवाभावी संस्था यांनाही जागृती व प्रशासनासोबत समन्वयाच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.

Web Title: Corona: Disaster Management Act applicable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.