प्रदीप भाकरे अमरावती : नाव मोठ्या कंपन्यांचे, पण आतला माल मात्र बनावट! अमरावती शहर गुन्हे शाखेने वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या 'फेक फॅक्टरी'चा पर्दाफाश केला आहे. मंगळवारी नया अकोला परिसरातील दोन कारखान्यांवर पोलिसांनी धाड टाकून तब्बल ७१ लाख २० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईने बनावट वस्तू बनवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम सुरू असतानाच, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. चांदुरबाजार रोडवरील नया अकोला येथे ब्रँडेड कंपन्यांच्या नावाखाली बनावट साबण आणि निरमा पावडर तयार केली जात होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन कारखान्यांवर एकाच वेळी छापा टाकला.
जप्त केलेला मुद्देमाल (किंमत ७१.२० लाख रुपये):
- या कारवाईत पोलिसांनी केवळ तयार मालच नाही, तर तो बनवणारी यंत्रसामुग्रीही जप्त केली आहे. यामध्ये सर्फ एक्सल आणि व्हील पावडरची शेकडो पोती.
- निरमा पावडर पॅकिंग करण्याचे १५ लाख रुपये किमतीचे ५ नग मशीन.
- साबण पॅकिंग करण्याचे ४ लाख रुपये किमतीचे १ नग मशीन.
- विविध ब्रँड्सचे लेबल आणि प्लास्टिक पन्नीचे १० नग.
इलेक्ट्रिक वजन काटा आणि सतीननगर येथील गोदामातील मोठ्या प्रमाणावर असलेला कच्चा मालाचा समावेश आहे.
या बेकायदेशीर कारखान्याशी संबंधित असलेल्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये जुनेद खान यासीन खान (२८, पाकिजा कॉलनी), प्रफुल विष्णुपंत डोईफोडे (४८, न्यु म्हाडा कॉलनी), शेख भुरु शेख मुनीर (५०, झेंडा चौक) आणि शेख कलीम शेख माजीद (४०, बिस्मीला नगर) यांचा समावेश आहे. या आरोपींकडे कारखाना चालवण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. हा बनावट माल नेमका कुठून आणला जात होता आणि कुठे विकला जाणार होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
ही मोठी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, सागर घुगे, आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सपोनि मनिष वाकोडे, पोलीस अंमलदार सतिश देशमुख, मंगेश लोखंडे, गजानन ढेवले आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश होता.
Web Summary : Amravati police uncovered a counterfeit soap and detergent factory, seizing ₹71.20 lakh worth of goods. The raid in Naya Akola revealed machines and materials used to produce fake branded products. Four individuals were arrested for operating without a license; an investigation is underway.
Web Summary : अमरावती पुलिस ने नकली साबुन और डिटर्जेंट फैक्ट्री का पर्दाफाश किया, ₹71.20 लाख का माल जब्त किया। नया अकोला में छापे में नकली ब्रांडेड उत्पादों के उत्पादन के लिए इस्तेमाल की जाने वाली मशीनें और सामग्री मिली। बिना लाइसेंस के संचालन के लिए चार लोग गिरफ्तार।