विदर्भात पाणवठ्यांवर ‘अलर्ट’, विषप्रयोगाची भीती; नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वन कर्मचारी तैनात
By गणेश वासनिक | Updated: February 27, 2023 17:54 IST2023-02-27T17:52:34+5:302023-02-27T17:54:18+5:30
‘लिटमस’ पेपरचा हाेणार वापर

विदर्भात पाणवठ्यांवर ‘अलर्ट’, विषप्रयोगाची भीती; नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वन कर्मचारी तैनात
अमरावती : फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. विदर्भात यंदा सूर्य आग ओकण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल, मे महिन्यात जंगलात आग धुमसणार असे संकेत आहेत. त्यामुळे विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांत पाणवठ्यांवर आतापासून ‘अलर्ट’ करण्यात आले आहे. बीटनिहाय पाणवठ्याची जबाबदारी वन कर्मचाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे.
मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्य हे विदर्भात, तर सह्याद्री हा पश्चिम महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प आहे. मात्र, पाणवठ्यावर अशा कोणत्याही घटना होऊ नये, यासाठी व्याघ्र प्रकल्पातील वनाधिकारी, कर्मचारी ‘अलर्ट’ करण्यात आले आहेत.
पाच ते दहा फुटांवर पाणवठे तयार करा
उन्हाळ्यात मेळघाट, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात भीषण पाणीसमस्या उद्भवते. परिणामी आतापासून वाघांची तृष्णा भागविण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. वाघांना पाण्यासाठी भटकंती होणार नाही, यासाठी पाच ते दहा फुटांच्या अंतरावरच कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे नियोजन आहे.
विषप्रयोगाच्या तपासणीसाठी ‘लिटमस’ पेपर
कृत्रिम पाणवठ्यात विषप्रयोगाद्वारे वाघांच्या शिकारीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कृत्रिम पाणवठ्यात १२ तासांपेक्षा अधिक वेळ पाणी साठवून राहू नये. पाणवठ्यात कुणी विषप्रयोग केला असेल तर तपासणीसाठी ‘लिटमस’ पेपरचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पाणवठ्यात कुणी विषप्रयोग केला असेल तर तपासणीनंतर ‘लिटसम’ पेपर लाल होतो, हे विशेष.
यंदा पाण्यासाठी कोणत्याही वन्यजिवांची भटकंती होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार व्याघ्र प्रकल्पात अलर्ट केले आहे.
- ज्योती बॅनर्जी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.