अमरावतीत होडी उलटून ११ जण बुडाले; वर्धा नदीत दुर्घटना, नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 05:51 IST2021-09-15T05:50:14+5:302021-09-15T05:51:00+5:30

मुसळधार पाऊस कोसळल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.

11 drown after boat capsizes in Amravati Accident in Wardha river pdc | अमरावतीत होडी उलटून ११ जण बुडाले; वर्धा नदीत दुर्घटना, नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले

अमरावतीत होडी उलटून ११ जण बुडाले; वर्धा नदीत दुर्घटना, नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले

लोकमत न्यूज नेटवर्क

वरूड (जि. अमरावती) : तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात नाव उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. नावाड्यासह तिघांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले. त्यात दोन वर्षीय बालिकेचा समावेश आहे. इतरांचा शोध सुरु आहे. मुसळधार पाऊस कोसळल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.

गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीसाठी नातेवाईक आले होते. विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहोचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा आहे. त्यामुळे मटरे कुटुंबातील १२ जणांना नौकानयनाचा मोह झाला. सकाळी दहाच्या सुमारास नाव महादेव मंदिराकडे जात असताना उलटली. नावेत १३ जण होते. त्यात अतुल वाघमारे (२५), वृषाली अतुल वाघमारे (२०), अदिती खंडाते (१०), मोना खंडाते (१२), आशु खंडाते (२१, सर्व रा. वर्धा), निशा मटरे (२२), पियुष मटरे (८, दोघे रा. गाडेगाव), पुनम शिवणकर (२६) यांचा समावेश आहे. नाविक नारायण मटरे (४५), किरण खंडारे (२८), वंशिका शिवणकर (२) यांचे मृतदेह सापडले.

बेकायदेशीर जलपर्यटनाचे बळी

नागपूर-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीतील झुंज धबधब्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. येथे मच्छीमारांच्या होड्यांमध्ये नदीत फेरफटका मारणे याचे पर्यटकांना आकर्षण असते. अनेकदा नाविक होडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांना बसवतात. जलसफारी करताना जीवरक्षक साधनांचा वापर होत नाही. जल सफारी घडवणाऱ्या या होड्या पूर्णतः बेकायदेशीर आहेत. त्यांना मच्छीमारी किंवा पर्यटन असा कोणताही परवाना नाही. हे ११ जण याच बेकायदेशीर जलपर्यटनाला बळी पडले.

अडथळ्यांतही बचावकार्य सुरू

मुसळधार पावसातही प्रशासनामार्फत बचाव व शोधकार्य सुरू असून नावेतील सर्वांना जलसमाधी मिळाल्याची शक्यता आहे. अमरावतीवरुन जिल्हा शोध व बचाव पथकाच्या २० जणांची चमू दाखल झाली असून शोधकार्य सुरु आहे. तसेच नागपूर येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच राज्य आपत्ती निवारण दलाची चमूही दाखल झाली आहे.
 

Web Title: 11 drown after boat capsizes in Amravati Accident in Wardha river pdc