वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात संशोधकांना सापाची नवी प्रजाती आढळून आली. सदर प्रजातीस राज्यात पर्यायी स्थानिक नाव नसल्याने याचे ‘शरशीर्षी तस्कर’ असे मराठमोळे नामकरण वन्यजीव संशोधक अशहर रजा खान आणि अंकित बिबेकर यांनी केले आहे.
अशहर रजा खान आणि अंकित बिबेकर यांना मेळघाटच्या जंगलातील गाविलगडच्या पायथ्याशी एक साप उंदीर भक्षण करताना आढळला. सदर सापाची छायाचित्रे व आवश्यक माहिती संकलित करण्यात आली. त्याचे शास्त्रीय नाव ‘सिलॉगनेथ्स हेलेना निग्रीएंगुलरीस’ असून, याला इंग्रजीत ‘रो-हेडेड ट्रिंकेट’ असे म्हणतात. या दुर्मीळ नोंदीबाबतचे संशोधनपत्र अमेरिकेच्या कान्सास विद्यापीठातील ‘रेप्टाइल एन्ड एम्फिबीयन्स जर्नल’ने प्रकाशित केला आहे. हा साप बिनविषारी असल्याने भक्ष्याला अजगराप्रमाणे विळखा देऊन, गुदमरूम मारतात.

महाराष्ट्रातील दुसरीच नोंद
शरशीर्षी तस्कर साप बिनविषारी असून, प्रामुख्याने उंदीर, पाली-सरड्यांवर गुजराण करते. आतापर्यंत ही प्रजाती पूर्व भारतात आढळली असून, महाराष्ट्रात एकदाच ताडोबा (चंद्रपूर) अभयारण्यात सापडली. मेळघाटातील नोंद या सापाची वर्तमान अंतिम पश्चिम विस्तारहद्द आहे.

लांबी १०० सेमी
शरशीर्षी तस्कराची सरासरी लांबी शंभर सेमी असून, डोक्यावर काळी बाणाकृती खूण असते. ऊर्ध्व शरीरावर पैंजणीसारखे उभे पट्टे असून, पार्श्व शरीरावर दोन समांतर जाड, आडव्या रेषा शेपटापर्यंत गेलेल्या असतात, अशी माहिती निसर्गप्रेमी अनिकेत बिबेकर यांनी दिली.

Web Title: -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.