तोफ चोरी प्रकरणाचे धागेदोर हैदराबादपर्यंत!

By Admin | Updated: January 2, 2015 00:37 IST2015-01-02T00:37:46+5:302015-01-02T00:37:46+5:30

तपास सुरूच: आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता.

Thunderbird Thief Threat to Hyderabad! | तोफ चोरी प्रकरणाचे धागेदोर हैदराबादपर्यंत!

तोफ चोरी प्रकरणाचे धागेदोर हैदराबादपर्यंत!

बुलडाणा : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यातून २२ डिसेंबर रोजी झालेल्या तोफ चोरी प्रकरणाचे धागेदोरे हैदराबादपर्यंंत पोहोचले आहेत. ही तोफ हैदराबाद येथील एका तस्कराला विकली जाणार होती, अशी माहिती पोलीसांच्या हाती लागली असून, याप्रकरणातील आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तोफ चोरी प्रकरणात मुख्य आरोपी बाळू म्हस्के याच्यासह अटकेत असलेल्या इतर आरोपींची चौकशी सुरू असून, तपासामध्ये पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोर लागले आहेत. चोरी केलेली तोफ पंचधातूची होती. त्यामध्ये सोन्याचे प्रमाण पाच ते सहा टक्के असू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे ८५ किलोच्या या तोफेतील सोन्याची किंमतही कोटीच्या घरात जाते. ही तोफ ऐतिहासीक वस्तू म्हणून विकली तर, त्यापेक्षाही जास्त किमंत मिळू शकली असती. त्यामुळे बाळू म्हस्के हा हैदराबाद येथील एका तस्कराशी या तोफेचा सौदा करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती आता तपासातून समोर येत आहे. त्या अनुषंगाने पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

*एका आरोपीस पोलिस कोठडी
तोफ चोरी प्रकरणात पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली होती. त्यापैकी चार आरोपी न्यायालयीन कोठडीत, तर एका आरोपीस ८ जानेवारीपर्यंंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.
या चोरीप्रकरणात मुख्य आरोपी बाळू जगन्नाथ म्हस्के याच्यासह शंकर शिवाजी केवट, आकाश पंजाबराव निलख आणि सिद्धार्थ नामदेव काळे या चौघांना अटक करण्यात आली होती. या चारही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. २८ डिसेंबर रोजी बोराखेडी बावरा येथील जगन किसन खरात याला सिंदखेडराजा पोलिसांनी बोराखेडी बावरा येथून अटक केली. जगन खरात याला न्यायालयात हजर केले असता, त्याला ८ जानेवारीपर्यंंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title: Thunderbird Thief Threat to Hyderabad!