माती परीक्षणाकडे ८५ टक्के शेतक-यांची पाठ

By Admin | Updated: June 15, 2015 02:08 IST2015-06-15T01:45:42+5:302015-06-15T02:08:55+5:30

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ८५ शेतक-यांकडून आजपर्यंंत एकदाही माती परीक्षण करण्यात आले नाही.

Text of 85 percent of the farmers surveyed | माती परीक्षणाकडे ८५ टक्के शेतक-यांची पाठ

माती परीक्षणाकडे ८५ टक्के शेतक-यांची पाठ

अकोला- विदर्भातील शेतकर्‍यांनी जमिनीचा पोत ओळखून पीक घेण्यासाठी माती परीक्षण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील ८५ शेतकर्‍यांकडून आजपर्यंंत एकदाही माती परीक्षण करण्यात आले नाही. माती परीक्षणाबाबत माहिती असून, केवळ प्रयोगशाळा लांबवर असल्याने माती परीक्षणाकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याचे सत्य डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राबविलेल्या संशोधन प्रकल्पातून उघड झाले. पीडीकेव्हीच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे विदर्भातील सहा जिल्ह्यात माती परीक्षणासंदर्भातील संशोधन प्रकल्प राबविण्यात आला. हा प्रकल्प राबवित असताना आढळून आलेले तथ्य राज्य आणि केंद्र शासनाच्या धोरणाला धक्का पोहोचविणारे आहे. रासायनिक खतांवर होणारा खर्च आणि खतांच्या वाढत्या किमती यामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांसाठी उत्पादनावरील खर्च कमी करण्याच्या उद्देशाने माती परीक्षणावर भर दिला जात आहे. माती परीक्षण करून आवश्यक त्या खतांचा आणि आवश्यक तेवढाच वापर करून जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, शेतकर्‍यांना याची जाणीव असून, ८५ टक्के शेतकर्‍यांनी माती परीक्षणाकडे पाठ फिरविल्याचे वास्तव पीडीकेव्हीच्या संशोधन प्रकल्पादरम्यान आढळून आले. प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या सर्वेक्षणातून तयार करण्यात आलेल्या या संशोधनाला २८ ते ३0 मेदरम्यान राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात झालेल्या संयुक्ती कृषी संशोधन आणि विस्तार समितीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर राज्य शासनालाही हा अहवाल देण्यात आला. हे सर्वेक्षण पीडीकेव्हीचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण विभागाचे संचालक तथा विभागप्रमुख डॉ. डी.एम. मानकर, प्रा. डॉ. एन.एम. काळे, डॉ. पी.पी. वानखेडे, डॉ. पी.पी. भोपळे, डॉ.आर.एस. वाघमारे यांनी केले.

Web Title: Text of 85 percent of the farmers surveyed