मान्सून पोहोचला पण पाऊस नाही!

By Admin | Updated: June 25, 2014 02:40 IST2014-06-25T01:57:47+5:302014-06-25T02:40:36+5:30

गुरुवार, शुक्रवारी विदर्भात तुरळक पावसाची शक्यता

Monsoon rains but there is no rain! | मान्सून पोहोचला पण पाऊस नाही!

मान्सून पोहोचला पण पाऊस नाही!

अकोला : मान्सून सर्वत्र पोहोचला पण पाऊसच नाही, राज्यात प्रथमच अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून, मान्सूनचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे भाकीत नागपूर वेधशाळेने वर्तविले आहे. २६ ते २८ जूनपर्यंत विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यताही या वेधशाळेने वर्तविली आहे.
विदर्भात नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होत असते. नागपूर मध्यभागी असल्यामुळे अरबी व बंगाल या दोन्ही उपसागराकडून येणार्‍या मान्सूनचा फायदा विदर्भाला होत असतो. म्हणजेच या दोन्ही उपसागराकडून येणारा मान्सून विदर्भात बरसतो. असे असले तरी बंगालच्या उपसागराकडून येणार्‍या मान्सूनचा जोर जास्त असतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणूनच अरबी समुद्राकडून येणार्‍या पावसाच्या दुप्पट पाऊस बंगालच्या उपसागराकडे तयार झालेल्या मान्सून प्रणालीकडून विदर्भाला मिळतो; परंतु यावर्षी या दोन्हीकडून येणारी मान्सून प्रणाली अशक्त आहे. आठवडाभरापुर्वी विदर्भात मान्सून दाखल झाला. पण प्रणाली सशक्त नव्हती. सध्या नैऋ त्यकडून जे वारे वाहत आहेत, त्यामध्ये ओलावा नाही. त्यामुळे आणखी दोन-तीन दिवस सार्वत्रिक पावसाची सुतराम शक्यता नसल्याचे नागपूर वेधशाळेने स्पष्ट केले आहे. तथापि २६ ते २८ जूनपर्यंत विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यावर्षीच्या पावसावर एलनीनोचा प्रभाव राहील. एलनीनोमुळे संपूर्ण भारतातच प्रतिकूल वातावरण आहे. त्याचा फटका विदर्भाला जास्त तर नाही; परंतु सरासरी पावसाच्या ५ ते १0 टक्के पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागानेदेखील अशाच आशयाचे भाकित वर्तविले आहे.

Web Title: Monsoon rains but there is no rain!