कावसा ग्रामसेवकाने केला दीड लाखांचा अपहार

By Admin | Updated: January 1, 2015 01:42 IST2015-01-01T01:42:30+5:302015-01-01T01:42:30+5:30

गुन्हा दाखल.

Kavasa Gramsevak takes action against 1.5 lakhs | कावसा ग्रामसेवकाने केला दीड लाखांचा अपहार

कावसा ग्रामसेवकाने केला दीड लाखांचा अपहार

दहीहांडा ( आकोट,जि. अकोला) : आकोट तालुक्यातील कावसा गावात निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालये बांधण्यासाठी शासनाकडून मिळालेल्या रकमेतून १ लाख ५६ हजार ४00 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ग्रामसेवक सुरेश वामनराव अरुळकर यांच्याविरुद्ध दहीहांडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालीदास तापी यांच्या फिर्यादीवरून मंगळवार, ३0 डिसेंबर रोजी अरुळकर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४0९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कावसा येथील काही लाभार्थींनी त्यांना शौचालयाचे अनुदान मिळाले नसल्याची तक्रार गटविकास अधिकारी आकोट यांच्याकडे केली होती. त्यावरून गटविकास अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. ग्रामसेवकाने सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त खात्यामध्ये अनुदानाचा धनादेश जमा करावयास हवा होता; परंतु सदर ग्रामसेवकाने दुसर्‍या खात्यामध्ये धनादेश जमा केला व रक्कम काढून ती हडप केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. दहीहांडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Kavasa Gramsevak takes action against 1.5 lakhs