‘आधार’शिवाय कसा मिळणार शैक्षणिक योजनांचा लाभ?

By Admin | Updated: June 15, 2015 01:53 IST2015-06-15T01:53:52+5:302015-06-15T01:53:52+5:30

अनेक विद्यार्थ्यांकडे नाही आधार कार्ड : शाळा सुरू होण्यास उरले फक्त ११ दिवस.

How to get the benefit of educational schemes without 'Aadhaar'? | ‘आधार’शिवाय कसा मिळणार शैक्षणिक योजनांचा लाभ?

‘आधार’शिवाय कसा मिळणार शैक्षणिक योजनांचा लाभ?

अकोला : नवीन शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्यात आलेल्या 'स्टुडंट डेटा बेस' प्रणालीमुळे सर्वच विद्यार्थ्यांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे. परंतु, शाळा सुरू होण्यास पंधरा दिवसांहून कमी कालावधी राहिला असला तरी, अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आधार कार्डशिवाय शैक्षणिक योजनांचा लाभ कसा मिळणार, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शाळा प्रवेशानंतर विद्यार्थ्यांना मिळणार्‍या अपुर्‍या सुविधा, खालावलेला शैक्षणिक विकास, तसेच शासकीय योजनांचा लाभ न मिळणे, यामुळे पालकांची नेहमीच निराशा होते. परंतु, पालकांना आता एका क्लिकवर आपल्या पाल्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय योजना, त्याला या योजनांचा लाभ मिळाला की नाही, योजनांचा लाभ मिळवण्यासाठी काय करावे, याबद्दलची संपूर्ण माहिती शासनाच्या 'स्टुडंट डेटा बेस' या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळावर शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित सर्वच शाळांना विद्यार्थ्यांचे खाते निर्माण करणे बंधनकारक होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे खाते आधार कार्ड संलग्नित (लिंक) करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक हाच त्याच्या खात्याचा पासवर्ड असणार आहे. परंतु, शाळा उघडण्यास पंधरा दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असला तरी, अनेक विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड 'स्टुडंट डेटा बेस'च्या खात्याला संलग्नित करण्यात आले आहेत, अशाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ मिळणार आहे. आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांंना आधार कार्डशिवाय शैक्षणिक योजनांचा लाभ कसा मिळणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आधार कार्डशिवाय या योजनांचा लाभ मिळणार नसल्याने शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांंचे आधार कार्ड काढण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Web Title: How to get the benefit of educational schemes without 'Aadhaar'?