वन विभाग घेणार शाळांमधील वृक्षारोपण मोहिमांचा लेखाजोखा

By Admin | Updated: July 18, 2015 01:18 IST2015-07-18T01:18:09+5:302015-07-18T01:18:09+5:30

वृक्षदिंड्यांची गत तीन वर्षांची माहिती संकलित करणार.

The forest department will take note of the plantation campaigns in schools | वन विभाग घेणार शाळांमधील वृक्षारोपण मोहिमांचा लेखाजोखा

वन विभाग घेणार शाळांमधील वृक्षारोपण मोहिमांचा लेखाजोखा

अकोला: राज्यातील शाळांमध्ये दरवर्षी राबविल्या जाणार्‍या वृक्षारोपण मोहिमांची अंमलबजावणी प्रभावीरीत्या व्हावी, यासाठी शाळांमधील वृक्षारोपण कार्यक्रमांची माहिती आता वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून संकलित केली जाणार आहे. त्याअनुषंगाने शाळांनी ही माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५जुलै रोजी जारी केले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्य प्राणी, जैवविविधता, तसेच दुर्मीळ अशा वनसंपदेचे रक्षण व त्याचे संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम वयातच जाणीव व आवड निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी ५ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत साजरा होणार्‍या वन महोत्सवादरम्यान शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जातो. वृक्षदिंड्या काढून वृक्षारोपणाबाबत जनजागृती केली जाते. या वृक्षारोपण मोहिमांमध्ये गत तीन वर्षांत किती झाडे लावली व त्यापैकी किती झाडे जगली, याची माहिती आता सामाजिक वनीकरण विभागाकडून घेतली जाणार आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यावर्षी राज्यातील शाळांमध्ये वृक्षारोपण योजना राबविण्यासंदर्भातील निर्देश १५ जुलै रोजी जारी केले. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये वृक्षारोपण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक शाळांना २0 रोपांचे पॅकेज सामाजिक वनीकरण विभागाकडून देण्यात येणार आहे. यामध्ये आंबा, चिंच, आवळा, कवळ, कापू, फणस, वड, पिंपळ, निम, गुलमोहर, चाफा आदी जातीची रोपं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शाळेच्या प्रांगणात लावलेल्या झाडांचे किमान चार वर्षे संगोपन करण्याची जबाबदारी शाळांची राहणार आहे.

 

Web Title: The forest department will take note of the plantation campaigns in schools