CoronaVirus : शिक्षणाधिकाऱ्यांनी केली महापालिका शाळांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 02:52 PM2020-03-18T14:52:32+5:302020-03-18T14:52:40+5:30

शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी मनपाच्या १२ शाळांची आकस्मिक पाहणी केली.

CoronaVirus: Officials inspect municipal schools |  CoronaVirus : शिक्षणाधिकाऱ्यांनी केली महापालिका शाळांची पाहणी

 CoronaVirus : शिक्षणाधिकाऱ्यांनी केली महापालिका शाळांची पाहणी

Next

अकोला: कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने ३१ मार्चपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पृष्ठभूमीवर महापालिकेच्या सर्व ३१ शाळा बंद ठेवण्यात आल्या असून, मुख्याध्यापक, शिक्षक हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. त्यानुषंगाने मंगळवारी मनपाच्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी मनपाच्या १२ शाळांची आकस्मिक पाहणी करीत उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षकांसोबत चर्चा केली.
गत काही दिवसांपासून राज्यात कोरोना आजाराचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या बाबीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण राज्यातील शाळा, महाविद्यालये, जीम, जलतरण तलाव, धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गर्दी टाळण्याच्या उद्देशातून यात्रा, जत्रा, मेळावा, विविध कार्यक्रम रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुषंगाने महापालिकेच्या ३१ शाळांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी मनपाच्या सर्व शाळांमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळाला. यादरम्यान शाळेत मुख्याध्यापक, शिक्षकांना हजेरी लावण्याचे निर्देश असल्याने मनपा शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी १२ शाळांची आकस्मिक पाहणी केली. यावेळी शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक कार्यरत असल्याचे दिसून आले.

शहरातील धार्मिक स्थळे उघडी!
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी विविध उपाययोजनांसंदर्भात आदेश निर्गमित केला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन तातडीने निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अकोलेकर या नात्याने सर्वांची आहे. अशा स्थितीत धार्मिक स्थळांवर गर्दी टाळणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.


शाळा बंद; विद्यार्थी मैदानात
शासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय जारी केला. गर्दी टाळणे हा उद्देश असला तरी शहराच्या विविध भागातील मोकळ्या मैदानांवर परिसरातील विद्यार्थी, युवक क्रिकेटसह अनेक खेळ खेळताना दिसत आहेत. यावर संबंधितांच्या कुटुंबीयांनीच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

Web Title: CoronaVirus: Officials inspect municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.