बॅँक शाखाधिकारी, रोखपाल भीषण अपघातात ठार

By Admin | Updated: July 18, 2015 02:22 IST2015-07-18T02:22:28+5:302015-07-18T02:22:28+5:30

ट्रकची दुचाकीला धडक; चार तास वाहतूक विस्कळीत.

Bank branch officer, cashier killed in a horrific crash | बॅँक शाखाधिकारी, रोखपाल भीषण अपघातात ठार

बॅँक शाखाधिकारी, रोखपाल भीषण अपघातात ठार

व्याळा (जि. अकोला): ट्रकने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी येथील बस थांब्यावर घडली. मृतकांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे शाखाधिकारी प्रदीप एकनाथ बाजड आणि रोखपाल अमोल भास्कर गावंडे यांचा समावेश आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे व्याळा येथील शाखाधिकारी प्रमोद बाजड आणि रोखपाल अमोल गावंडे हे दोघे शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एमएच-३0-एएच-६७५३ क्रमांकाच्या दुचाकीने व्याळा येथील बस थांब्यावर पोहोचले. ते व्याळा गावाकडे निघाले असताना, रेतीची वाहतूक करीत असलेल्या एमएच-२७ -एक्स-१६0१ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत गावंडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला, तर बाजड यांना अकोला येथील रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
या भीषण अपघाताची वार्ता परिसरात पसरताच, संतप्त ग्रामस्थांनी बस थांब्यावर धाव घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. येथील बस थांब्यावर गतिरोधक नसल्याने नेहमीच अपघात घडतात. त्यामुळे गतिरोधकाच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. परिणामी महामार्गावर चार तास वाहतुकीची कोंडी झाली होती. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बाळापूर आणि अकोला येथून पोलिसांची जादा कुमक बोलाविण्यात आली होती. तब्बल चार तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.

 

Web Title: Bank branch officer, cashier killed in a horrific crash