कल्याण रेल्वे स्थानकावर तो तिला भेटला, भावाच्या घरी नेले; नंतर धावत्या रेल्वेत केला लैंगिक अत्याचार; Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:33 IST2025-07-12T17:31:29+5:302025-07-12T17:33:10+5:30
Akola Crime news: अकोल्यातील रेल्वे स्थानकावरून मुलगी असहाय्य अवस्थेत पडलेली होती. त्यावेळी पोलिसांचे तिच्याकडे लक्ष गेले. चौकशी केल्यानंतर कल्याणपासून तिच्यासोबत झालेला प्रकार समोर आला.

कल्याण रेल्वे स्थानकावर तो तिला भेटला, भावाच्या घरी नेले; नंतर धावत्या रेल्वेत केला लैंगिक अत्याचार; Inside Story
मुंबईतील कल्याणरेल्वे स्थानकातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून रेल्वेने अकोल्याला आणत असताना तिच्यावर धावत्या रेल्वेत अत्याचार करणाऱ्या आरोपीस कल्याण रेल्वे पोलिसांनी अकोल्यातील पातूर तालुक्यात असलेल्या शेखापूर येथून अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
घटनेनुसार, २९ जूनला ही अल्पवयीन मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात होती. कल्याण पश्चिमेकडील पादचारी पुलावरून पूर्वेकडे जात असताना चव्हाण या तरुणाने तिला हेरले. त्याने तिच्याशी ओळख करून घेतली आणि गप्पांच्या दरम्यान तिला आपल्या विश्वासात घेतले.
भावाच्या घरी घेऊन गेला पण घरात घेण्यास दिला नकार
आरोपीने तिला त्याच्या भावाच्या घरी नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या भावाने तिला घरात घेण्यास नकार दिला. त्याने कल्याण स्थानकातून अकोल्याकडे जाणारी एक्स्प्रेस पकडली आणि त्या मुलीला आपल्याबरोबर घेतले.
इगतपुरी ते अकोला दरम्यानच्या प्रवासात त्याने या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केली. बलात्कारानंतर तो तिला अकोला येथील घरी घेऊन गेला, मात्र त्याच्या कुटुंबीयांनीही पीडित मुलीला स्वीकारण्यास नकार दिला.
रेल्वे स्थानकावर सोडून निघून गेला
परिणामस्वरूप, त्याने तिला पुन्हा अकोला रेल्वे स्थानकावर आणून सोडले. अकोला रेल्वे स्थानकावर असहाय्य अवस्थेत आढळलेल्या पीडित तरुणीची रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता, घटना पोलिसांना सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास कल्याण रेल्वे पोलिसांकडे सोपवला.
सीसीटीव्हीमुळे सापडला आरोपी
पीडित मुलीलाही कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर, कल्याण रेल्वे पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी आरोपीची ओळख पटवली आणि गजानन चव्हाण या व्यक्तीचा शोध घेतला.
हा नराधम अकोला येथे लपून बसला होता. ही माहिती मिळाल्यानंतर, जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेखापूर येथे सापळा रचून त्याला अटक केली.