श्रीगोंदा : वाढती महागाई, इंधन दरवाढीविरोधात श्रीगोंद्यात युवक काँग्रेसने शुक्रवारी सकाळी बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली हा माेर्चा काढण्यात आला. शहरातील तुळशीदास मंगल कार्यालय येथून बैलगाडी रॅलीस प्रारंभ झाला. तहसील कार्यालय येथे रॅली आल्यानंतर तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनास राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शिवसेनेनेही पाठिंबा दिला. कार्यकर्ते आंदोलनात सहभागीही झाली. प्रशांत ओगले म्हणाले, केंद्रात सत्ता मिळविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार, महागाई कमी करू, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात १२ कोटी बेरोजगारी वाढली. महागाई कमी झाली नाही. कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या लोकांना मदत करण्याऐवजी पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवून आधीच पिचलेल्या लोकांना महागाईच्या खाईत लोटले, अशी टीका केली.
यावेळी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. गोरख बायकर, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मेहेत्रे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, वडाळी गावचे सरपंच महेश दरेकर, संदीप उमाप, संदीप वागस्कर, नितीन खेडकर, प्रशांत सिदनकर, पवन मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
------
१६ श्रीगोंदा काँग्रेस
श्रीगोंदा येथे युवक काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.