सुपा औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे लसीकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST2021-08-17T04:26:52+5:302021-08-17T04:26:52+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे लसीकरण रखडले आहे. काही कामगारांना त्यांच्या कारखाना प्रशासनाने लस उपलब्ध करून ...

Vaccination of workers in Supa industrial estate stalled | सुपा औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे लसीकरण रखडले

सुपा औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे लसीकरण रखडले

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील कामगारांचे लसीकरण रखडले आहे. काही कामगारांना त्यांच्या कारखाना प्रशासनाने लस उपलब्ध करून दिली तर काही छोट्या मोठ्या कारखान्यांनी मात्र लसीकरण मोहीम बासनात गुंडाळून ठेवली आहे. याबाबत तपास करून संबंधितांवर कारवाई करणारी यंत्रणा नसल्याने कामगार धास्तावले आहेत.

कामगारांना शासकीय दवाखान्यात लस देण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश नसल्याने इतर नागरिकांप्रमाणे नंबर लावून प्रतीक्षेत थांबण्यासाठी त्यांच्याकडे वेळही नाही. जे कारखाने या कामगारांकडून काम करून घेतात त्यांनीच लसीकरण करून घेणे ही त्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर लसीकरण करण्याचे काम सोपवण्यात आलेले नाही. त्यामुळे काही कारखान्यांनी त्याकडे उघडपणे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येते. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना काही नियमांच्या अधिन राहून कारखान्यांना काम चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. अशावेळी गतवर्षी प्रमाणे काही कामगार आपापल्या गावाकडे गेले तरी बहुतांशी कामगारांनी येथेच राहून काम करण्याचा निर्णय घेतल्याने सुपा एमआयडीसीतील कारखान्यांची उत्पादन प्रक्रिया खंडित होण्यापासून वाचली. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात जीवावर बेतलेले असताना जोखीम पत्करून कामगारांनी काम केले. त्यामुळे कोरोनापासून संरक्षण करण्याकरिता लागणारी प्रतिबंधात्मक लस देण्याची जबाबदारी कारखान्यावर सोपवून त्यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद शासनाने केली असती तर, एव्हाना सर्व कामगारांचे लसीकरण झाले असते. परंतु, तसे झाले नाही.

एमआयडीसीतील कॅरिअर मायडिया, आम इंडिया, ईपीटॉम, जाफा यासारख्या काही कारखान्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कामगारांना लस देण्याची व्यवस्था केल्याचे सांगितले. आम इंडियाने ४५० कामगारांना लस दिली. तसेच त्यांच्या २०० कुटुंबीयांनाही लसीचा डोस दिल्याचे व्यवस्थापक संदीप गोखले यांनी सांगितले. ईपीटॉममधील कामगारांनाही कारखाना व्यवस्थापनाने कॅम्प आयोजित करून लसीकरण केल्याचे कारखान्याचे संचालक अनुराग धूत यांनी सांगितले. कॅरिअर मायडिया व्यवस्थापनानेही कामगारांना लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिल्याचे व्यवस्थापक पंकज यादव यांनी सांगितले.

----

कामगारांच्या लसीकरणाबाबत शासनाने कंपन्यांनी त्यांच्या पातळीवर व्यवस्था करण्याबाबत सुचविले आहे. कामगार आहेत म्हणून कारखाने चालतात. त्यामुळे कामगारांची काळजी घेण्याची जबाबदारी कारखान्यांची आहे. ज्या गावातून कामगार येतात तेथेच त्यांचे लसीकरण करता येईल.

-प्रकाश लाळगे,

तालुका आरोग्य अधिकारी, पारनेर

Web Title: Vaccination of workers in Supa industrial estate stalled