बोधेगाव : होळी व गुढीपाडवा सणासाठी लागणाऱ्या साखरगाठी बनविण्याचे काम सध्या व्यावसायिकांनी सुरू केले आहे. परंतु, यंदाही ऐन हंगामातच कोरोनाने डोकेवर काढल्यामुळे अनेकांनी यावर्षी गाठी उद्योगाला ब्रेक दिला आहे. यामुळे साखरगाठी बनविणाऱ्या पारंपरिक व्यवसायाला काहीशी घरघर लागल्याचे चित्र दिसते.
ज्याप्रमाणे दिवाळीला लाडू-करंज्या, मकर संक्रांतीला तीळगुळाचे महत्व असते. त्याप्रमाणे होळी व गुढीपाडव्याला साखरगाठींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बोधेगाव (ता. शेवगाव) येथील चाँदभाई सय्यद, कल्लूभाई सय्यद, सलीम सय्यद, नजमू सय्यद, अल्ताफ सय्यद, शौकत पठाण आदी हलवाई व्यावसायिक पारंपरिक पद्धतीने लाकडी साच्याद्वारे साखरगाठी बनवितात. परंतु, सध्या गाठी तयार करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यंदा येथील कल्लूभाई व नजमू सय्यद या दोघांनीच आपले गाठी कारखाने सुरू केले आहेत. मार्च ते एप्रिल हे दोन महिनेच साखरगाठींचा हंगाम असतो. साधारणपणे महाशिवरात्रीपासून गाठी बनविण्यास सुरुवात केली जाते, मात्र यावर्षी कोरोनाच्या स्थितीचा अंदाज घेऊन व्यावसायिकांनी उशिरा भट्ट्या पेटवल्या आहेत. प्रतिदिन एक व्यावसायिक साधारणतः दीड क्विंटल साखरेपासून सव्वा क्विंटल गाठी तयार करतात. या कामासाठी ५ ते ६ कामगार लागतात. तयार केलेला माल परिसरातील हाॅटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार व इतर व्यापाऱ्यांना होलसेल दराने तर आठवडे बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना प्रतिकिलो ७५ ते ८० रुपये किरकोळ भावात विकला जातो.
---
दरवर्षी साधारणपणे २० क्विंटल साखरेपासून गाठी बनवावी लागत असते. मात्र कोरोनामुळे सध्या परिसरातील बाजार बंद झाल्याने केवळ १० क्विंटल साखरेची गाठी तयार केली आहे. यंदाही व्यवसायात निम्म्याने घट झाली आहे.
-कल्लूभाई सय्यद,
साखरगाठी व्यावसायिक, बोधेगाव
---
अशी बनते.. साखरगाठी
प्रथम एका कढईत साधारणतः १० किलो साखर व गरजेप्रमाणे २-३ लिटर पाणी टाकून त्या द्रावणास उष्णता दिली जाते. त्यानंतर द्रावणावर येणारी मळी काढून तयार होणाऱ्या पाकामध्ये गाठींना पांढराशुभ्र रंग येण्यासाठी १०० मिलीलिटर दूध व चमक येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस टाकला जातो. तयार झालेला साखरेचा पाक घोटून दोरे टाकलेल्या ५-६ लाकडी साचे एकत्र बांधलेल्या संचात टाकला जातो. त्यानंतर काही वेळातच साचे खोलून नरम अवस्थेतील गाठी हाताने बाहेर काढली जाते. मग तयार गाठी सुकण्यासाठी वळणीवर टांगून ठेवली जाते. मग रिकामे झालेले लाकडी साचे पाण्याच्या साहाय्याने स्वच्छ केले जातात. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये दोरे टाकून साखरगाठी बनविण्यासाठी साचे सज्ज करून ठेवले जातात. विविध साईज, डिझाईनचे वेगवेगळे साचे असतात. रंगीबेरंगी गाठी तयार करण्यासाठी कलर पावडरचादेखील वापर केला जातो.
---
२५ बोधेगाव साखर गाठी
बोधेगाव येथील कल्लूभाई सय्यद यांच्या गाठी कारखान्यामध्ये साखरगाठी तयार करताना स्थानिक कामगार व मजूर.