मढीत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST2021-03-25T04:21:26+5:302021-03-25T04:21:26+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून (दि.२५) ...

मढीत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून (दि.२५) तीन दिवस गाव व मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवस जनता कर्फ्यू जाहीर केल्याची माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली.
वाडकर म्हणाले, तालुक्यातील शिरसाटवाडी येथे १९ मार्च रोजी रॅपिड टेस्टमध्ये चौदा कोरोना रूग्ण आढळल्यानंतर २३ ते २९ मार्चपर्यंत शिरसाटवाडी हे गाव कंटेंनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. सर्व व्यवहारही बंद राहणार आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालते. प्रशासनाने यात्रा यापूर्वीच बंद केली आहे. तरीही नाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक येत आहेत. त्यामुळे साथ रोगाची लागण झाली असावी अशी ग्रामस्थांना शक्यता वाटते. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व देवस्थान समितीने प्रशासनाला जनता कर्फ्यूबाबत माहिती दिली.
होळीच्या दिवशी सायंकाळी कैकाडी समाजाला मानाची काठी मंदिराच्या कळसाला टेकवण्यासाठी फक्त पाच लोकांना प्रशासनाने परवानगी दिली असून सायंकाळी मानाची होळी पेटविण्यासाठी गोपाळ समाजातील पाच मानकरी यांना परवानगी देण्यात आलेली आहे. होळी, चतुर्थी, रंगपंचमी, नाथषष्ठी, अमावस्या, गुढीपाडवा या दिवशी प्रशासनाने जमावबंदी आदेशासह यात्रा बंदी आदेश यापूर्वीच जाहीर केला आहे.