बनावट कागदपत्रांसह तिघा बांगलादेशींना घेतले ताब्यात

By अण्णा नवथर | Updated: June 27, 2025 20:06 IST2025-06-27T20:05:49+5:302025-06-27T20:06:19+5:30

अहिल्यानगर जिल्ह्यातील पोखर्डी शिवारात कारवाई

three Bangladeshis detained with fake documents in ahilyanagar | बनावट कागदपत्रांसह तिघा बांगलादेशींना घेतले ताब्यात

बनावट कागदपत्रांसह तिघा बांगलादेशींना घेतले ताब्यात

अण्णा नवथर, अहिल्यानगर : बनावट आधार व पॅनकार्ड तयार करून राहत असलेल्या तिघा बांगलादेशींना पोखर्डी (ता. अहिल्यानगर) शिवारातून एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहांगिर अबुताहेर (वय ३४, रा. चातूरठाण, हजीगंज, बांगलादेश), हनीफ अब्दुल खलीद शेख (वय ४०, रा. खाजीर खाली थाना, शेनबाग, बांगलादेश), मुश्रफ हबीब शेख (वय ४०, रा. चातूरठाण, हाजीगंज, बांगलादेश) असे ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. 

पोखर्डी (ता. अहिल्यानगर) शिवारातील वारुळेवस्ती येथील एका सिमेंटच्या खोलीत काही बांगलादेशी राहत असल्याची खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने वारुळे वस्ती येथे छापा टाकत तिघा बांगलादेशींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड मिळून आले. कोणताही व्हिजा अथवा परवाना नसताना घुसखोरी करून राहत असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक बी. चौधरी, मनोज मोंढे, राकेश खेडकर, राजु सुद्रीक, किशोर जाधव, सुरज देशमुख, जयशिंग शिंदे, शेरकर,दहिफळे, मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने केली. या कारवाईसाठी सदन कमांड मिलेट्री इन्टेलिजन्स अहिल्यानगर यांची मदत घेण्यात आली.

Web Title: three Bangladeshis detained with fake documents in ahilyanagar