सोयाबीन बियाण्याचे भाव वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:51+5:302021-04-16T04:20:51+5:30
सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने तालुक्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. ...

सोयाबीन बियाण्याचे भाव वाढण्याची शक्यता
सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असल्याने तालुक्यात पेरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाणाचे आहे. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षांत पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित होणारे सोयाबीन हे बियाणे म्हणून शेतकऱ्यांनी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित चांगल्या प्रतीच्या बियाण्यांची चाळणी करून निवड करावी. सोयाबीन बियाणाची बाह्यआवरण नाजूक व पातळ असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी. साठवणूक करण्यापूर्वी बियाणे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ताडपत्री, सिमेंटच्या खळ्यावर पातळ पसरून चांगले वाळवावे व बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण नऊ ते बारा टक्क्यांपर्यंत आणावे. सोयाबीन बियाणे साठवणूक करण्यासाठी बियाण्याची घरगुती पद्धतीने उगवणशक्ती तपासावी आणि किमान ७० टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे योग्य पद्धतीने साठवणूक करावे. वाळलेल्या बियाण्यातील शेंगा, फोलपटे, काडीकचरा, माती खडे इत्यादी काढून ते स्वच्छ करावे. स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या, नवीन पोत्यात साठवून ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. त्यामुळे साठवणुकीचे ठिकाण थंड किंवा ओलविरहित व हवेशीर असले पाहिजे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना त्याची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त असणार नाही, याची काळजी घ्यावी. बियाणे १०० किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांपेक्षा जास्त व ४० किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा जास्त मोठी थप्पी लावू नये. अन्यथा सर्वांत खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवण शक्ती कमी होते. पोत्यांची थप्पी जमिनीपासून १० ते १५ सेंटिमीटर उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी. पोत्यांची रचना उभ्या–आडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्यांची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच उंदरांचा उपद्रव टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. सोयाबीन बियाण्याचा पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहायक, कृषी पर्यावेक्षक, मंडळ कृषी अधिकारी तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे बोराळे यांनी केले आहे.