कुकडीच्या उन्हाळी आवर्तनासाठी श्रीगोंदेकर आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:05+5:302021-04-16T04:20:05+5:30

श्रीगोंदा : कुकडीचे उन्हाळी आवर्तन लवकरात लवकर मिळावे या प्रमुख मागणीसाठी श्रीगोंदेकर आक्रमक झाले आहेत. येथील कुकडी कार्यालयासमोर गुरुवारी ...

Shrigondekar aggressive for the summer rotation of the hen | कुकडीच्या उन्हाळी आवर्तनासाठी श्रीगोंदेकर आक्रमक

कुकडीच्या उन्हाळी आवर्तनासाठी श्रीगोंदेकर आक्रमक

श्रीगोंदा : कुकडीचे उन्हाळी आवर्तन लवकरात लवकर मिळावे या प्रमुख मागणीसाठी श्रीगोंदेकर आक्रमक झाले आहेत. येथील कुकडी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी धरणे आंदोलन करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनीही कुकडीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपर्यंत सोडावे, यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पुणे येथे निवेदन दिले. याच प्रश्नी पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्यासह कार्यकर्ते २२ एप्रिलला इस्लामपूर (ता.सांगली) येथे जलसंपदामंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. तसे निवेदन त्यांनी तेथील पोलीस ठाण्यात जाऊन दिले आहे.

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, दिनकर पंधरकर, प्रमोद जगताप, सुरेश भापकर या चौघांनी श्रीगोंदा येथील कुकडी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी धरणे आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी, संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्या प्रकरणी चौघा आंदोलकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबत मारुती भापकर म्हणाले, डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याचे काम आणि कुकडीचे आवर्तन २५ एप्रिलला सोडावे या मागणीसाठी धरणे आंदोलन केले. आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केलेले नाही. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांनी अटक केली. आम्ही आता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार आहोत.

पोलीस निरीक्षक रामराव ढिकले म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांचे संचारबंदी, जमावबंदीचे आदेश आहेत. आंदोलकांनी आंदोलन करून आदेशाचा भंग करू नये, अशी नोटीस दिली होती. मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे नाईलाजाने कारवाई करावी लागली.

कुकडीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन सोडावे, डिंभे ते माणिकडोह बोगद्याला निधी द्यावा, बोगद्याचे काम सुरू होईपर्यंत डिंभे ते येडगाव कालव्याची दुरुस्ती करावी, आदी मागण्यांसाठी राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी बुधवारी पुणे येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. कुकुकडीच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. कुकडीचे आवर्तन मे महिन्यात सोडल्यास कुकडी लाभक्षेत्रातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा परिसरातील पिके जळून जातील. त्यामुळे २५ एप्रिलला सोडणे आवश्यक आहे. हे आवर्तन श्रीगोंदा तालुक्यासाठी अगोदर द्यावे तसेच डिंबे-माणिकडोह जोड बोगद्याच्या कामासाठी निधी द्यावा, याकडे त्यांनी जलसंपदामंत्र्यांचे लक्ष वेधले.

--

२२ एप्रिलला जलसंपदामंत्र्यांच्या घरासमोर धरणे..

कुकडीचे आवर्तन आणि डिंभे-माणिकडोह बोगदा या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कुकडी पाटपाणी समितीचे कार्यकर्ते २२ एप्रिलपासून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये राजेंद्र म्हस्के, मारुती भापकर, माऊली मोटे, भूषण बडवे आदी सहभागी होणार आहेत.

--

१५ श्रीगोंदा आंदोलन, १५ श्रीगोंदा नागवडे

मारुती भापकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी श्रीगोंदा येथील कुकडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दुसऱ्या छायाचित्रात राजेेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांनी पुणे येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले.

Web Title: Shrigondekar aggressive for the summer rotation of the hen