अहमदनगर : कोरोनाने पुन्हा एकदा कहर केला असून, २४ तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल १३३८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाच्या वर्षात सप्टेंबर-२०२० मध्ये एकाच दिवशी सर्वाधिक १६१८ जण बाधित आढळून आले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गुरुवारची संख्या उच्चांकी आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनीही चिंता व्यक्त केली आहे. नगर शहरात २४ तासांत ४५७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने महापालिका प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून, दरदिवशी बाधितांची संख्या पहिल्या दिवशीपेक्षा जास्त होत आहे. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या चाचण्यांमध्ये वाढ झाल्याने बाधितांचीही संख्या वाढत आहे. सरकारी व खासगी रुग्णालयांत मिळून ४ हजार ७९९ इतके रुग्ण उपचार घेत आहेत.
गुरुवारी दुपारी १२ वाजता संपलेल्या २४ तासांत १३३८ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५११, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६५५ आणि अँटिजन चाचणीत १७२ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहरात सर्वाधिक ४५७ रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
गुरुवारी ६६० रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ९६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.२० टक्के इतके झाले आहे.
-------
गुरुवारचे पॉझिटिव्ह
अहमदनगर- ४५७, संगमनेर- १४८, राहाता- १४०, कोपरगाव- १०१, अकोले- ७४, शेवगाव- ७१, श्रीरामपूर- ६९, नगर ग्रामीण- ५१, पारनेर- ४६, जामखेड- ३७, पाथर्डी- ३०, राहुरी- २६, नेवासा- २४, श्रीगोंदा- १९, इतर जिल्हा- १६, कर्जत- १५, कन्टोन्मेटं बोर्ड- १४, (एकूण- १३३८)
------------------
जिल्ह्यातील कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ८२,०९६
उपचार सुरू असलेले रुग्ण : ४,७९९
मृत्यू : १,१८९