अहमदनगर : जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये गुन्हेगारांकडून वारंवार गावठी कट्ट्याचा वापर होत असल्यामुळे पोलिसांनी प्रामुख्याने नेवासा, श्रीरामपूर व राहुरी या तालुक्यांत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ८४ जणांच्या घरात सर्च ऑपरेशन करून ७ गावठी कट्टे व तीन तलवारी जप्त केल्या. यात १४ जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत या ऑपरेशनची माहिती दिली. जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्तीचे लोक हत्यारे बाळगून दहशत करत असल्याने त्यांचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी या लोकांच्या घराची झडती घेण्याबाबत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून सर्च वारंट घेतले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, दीपाली काळे, उपाधीक्षक संदीप मिटके, सुदर्शन मुंढे, बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, निरीक्षक रजजित डेर, मसूद खान, विजय करे, संजय सानप, नंदकुमार दुधाळ, सपोनि. सोमनाथ दिवटे, रामचंद्र करपे, सचिन बागूल, गणेश इंगळे यांच्यासह २५ उपनिरीक्षक व ३५० पोलीस अंमलदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वेगळवेगळी पथके करून २९ जुलैपासून पोलिसांनी श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यांत कारवाई करून ८४ घरांच्या झडत्या घेतल्या. त्यात ७ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, ३ तलवारी अशा एकूण २ लाख १३ हजार ९०० रुपये किमतीची हत्यारे जप्त करण्यात आले.
-----------
हे आरोपी घेतले ताब्यात
अशोक ऊर्फ देवा जालिंदर लष्करे (रा. संभाजीनगर, नेवासा फाटा), रितेश पूनमचंद साळवे (मक्तापूर, ता. नेवासा), शुभम विश्वनाथ गर्जे (रा. वडुले, ता. नेवासा), लक्ष्मण सहादू अडांगळे (रा. गंंगानगर, नेवासा), शाहरुख युनूस पटेल (संजयनगर, श्रीरामपूर), किरण रामू धोत्रे (रा. बाजारतळ, श्रीरामपूर), अनिल बाळू इरले (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), काशिनाथ बबन शिंदे (वैदूवाडी, सावेडी, नगर), शाहरुख ऊर्फ चाट्या जावेद शेख (रा. घोडेगाव, ता. नेवासा) यांच्यासह १४ आरोपी अटक केेले आहेत. यात सात आरोपींवर चार ते सहा गुन्हे दाखल आहेत.
-----------
फोटो - २९पोलीस कट्टे
पोलिसांनी सर्च ॲापरेशनमध्ये जप्त केलेले गावठी कट्टे व इतर हत्यारे.
------------