थकबाकी वसुलीसाठी व्यावसायिक गाळ्यांना ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:09+5:302021-03-26T04:20:09+5:30
कोपरगाव : नगरपरिषदेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाड्यासह इतर करांच्या थकबाकी वसुलीसाठी सील ठोकण्याच्या कारवाईची ...

थकबाकी वसुलीसाठी व्यावसायिक गाळ्यांना ठोकले सील
कोपरगाव : नगरपरिषदेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाड्यासह इतर करांच्या थकबाकी वसुलीसाठी सील ठोकण्याच्या कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी व गुरुवारी या दोन दिवसांत दहा गाळ्यांना सील ठोकण्यात आले आहे. या कारवाईमुळे थकबाकीदार गाळाधारकांचे चांगलेच धाबे दणाणले असून ३१ मार्च नंतरही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे नगरपरिषदेच्यावतीने सांगण्यात आले.
कोपरगाव शहरात नगरपरिषदेची १७ व्यापारी संकुले असून त्यात जवळपास ६५० व्यावसायिक गाळे आहेत. यापैकी जवळपास १०० गाळे धारकांनी पालिकेचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा कर थकवला असल्याने पालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवित गाळ्यांना टाळे ठोकण्यास सुरवात केली. थकबाकीदार गाळे धारकाकडे सरासरी प्रती गाळा रुपये ५० हजारच्या आसपास बाकी असल्याचे प्रशासनाचे सांगणे आहे. ही एकत्रित रक्कम कोटींच्या घरात गेली आहे. भाडे थकीत रक्कम १ कोटी १४ लाख तर डिपाॅझिट न भरलेल्या काही गाळे धारकांची २५ लाख अशी एकूण १ कोटी ३९ लाखांची थकबाकी आहे. शहराच्या विकास कामाकरीता सर्वांनीच वेळेत आपले कर भरणे आवश्यक असते. त्यातूनच शहराचा विकास साधता येत असतो. तरी थकबाकी लवकर भरण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना केले आहे. या कारवाई दरम्यान काही गाळेधारकांनी भाडे व करापोटी जागेवर धनादेश व रोख रक्कम भरल्याने त्यांच्यावरील कारवाई टाळली आहे. ही कारवाई उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्यासह मार्केट विभागाच्या पथकाने केली.
...............
कारवाई येथून पुढे कायम राबविण्यात येणार असून थकबाकीदार व्यक्तींनी आपल्याकउे असलेले कर त्वरित भरून कटु कारवाई टाळावी. तसेच जे गाळे धारक त्यांच्याकडील भाडे व करापोटी थकीत असलेली रक्कम भरणार नाही. असे गाळे नगरपरिषदेकडून ताब्यात घेऊन त्यांचा फेर लिलाव करण्यात येणार आहे.
- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, कोपरगाव