केडगावातील रस्त्याचे पॅचिंग निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:19+5:302020-12-25T04:17:19+5:30

केडगाव : पावसाळ्यात खड्डे पडलेल्या केडगावमधील अंतर्गत रस्त्यांच्या पॅचिंगचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची चौकशी करण्याची ...

Road patching in Kedgaon is inferior | केडगावातील रस्त्याचे पॅचिंग निकृष्ट

केडगावातील रस्त्याचे पॅचिंग निकृष्ट

केडगाव : पावसाळ्यात खड्डे पडलेल्या केडगावमधील अंतर्गत रस्त्यांच्या पॅचिंगचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी केडगाव जागरूक नागरिक मंचने महापालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.

पावसाळ्यात केडगावमधील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाट लागली. केडगाव ते शाहूनगर रस्ता तर पूर्ण खड्ड्यात बुडाला आहे. भूषणनगरमधील अंतर्गत रस्त्यांची अशीच दुर्दशा झाली आहे. इतर वसाहतीमधीत खराब झालेल्या रस्त्यांची नव्याने दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र, सध्या थातूरमातूर दुरुस्तीचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी पॅचिंगचे काम झाले तेथे दोन दिवसातच पुन्हा खड्डे पडले आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने खडी व दगडगोटे रस्त्यावर पसरले आहेत. पॅचिंगचे काम करून काहीच उपयोग झाला नसल्याने केडगाव जागरूक नागरिक मंचने या कामाची चौकशी करण्याची मागणी मनपाच्या आयुक्तांकडे केली आहे. तसेच प्रत्येक भागात रोज कचरागाडी नियमित फिरवणे, केडगावमध्ये बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यासाठी विद्युत साहित्य उपलब्ध करून द्यावे व बांधकाम साहित्य भर रस्त्यावर टाकून वाहतूक विस्कळीत बंद करणाऱ्या बांधकाम मालकांवर कारवाई करावी, अशा मागण्या या निवेदनात केल्या आहेत. यावेळी केडगाव जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे, अंबिका कंकाळ, डॉ. सुहास साळवे, गणेश पाडळे, प्रवीण पाटसकर आदी उपस्थित होते.

Web Title: Road patching in Kedgaon is inferior