अमेरिकेत नऊवारी साडीत योगाचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:38+5:302021-06-23T04:14:38+5:30
लोकमत विशेष केडगाव : अमेरिकेत आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून नऊवारी साडीमध्ये योग करण्याचा अनोखा विक्रम डॉ. संगीता ...

अमेरिकेत नऊवारी साडीत योगाचा विक्रम
लोकमत विशेष
केडगाव : अमेरिकेत आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून नऊवारी साडीमध्ये योग करण्याचा अनोखा विक्रम डॉ. संगीता तोडमल यांच्या नावावर नोंद झाला आहे. संगीता तोडमल पर्यावरण अभ्यासक असून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन तथा संयुक्त आयुष मंत्रालय प्रतिनिधी म्हणून त्या अमेरिकेत काम करतात.
संगीता तोडमल या मूळच्या नगर तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी आहेत. पुणे येथील पद्मश्री शीतल महाजन (स्काय ड्रायव्हर) यांनी पुणे नऊवारी साडी घालून तेरा हजार फुटांवरून उडी मारण्याचा विक्रम थायलंडमध्ये केला होता. तसेच बारामतीमध्ये लता करे यांनी चप्पल न घालता नऊवारी साडीमध्ये मॅरेथॉनमध्ये धावून अनोखेपण जपले होते. तसेच पूर्वीच्या महिला नऊवारी साडीमध्ये झिम्मा फुगडी, नागपंचमीचे फेर आणि भोंडला असे विविध कार्यक्रम करत असत. या सर्वांचा आदर्श घेत परदेशात महाराष्ट्राची नऊवारी साडीची परंपरा डॉ. संगीता तोडमल यांनी पुढे नेली आहे. अमेरिकेत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात जगातल्या ३० देशातील प्रतिनिधींनी भाग घेतला होता. या समारंभासाठी मुख्य संकल्पना सुजाता पाटील आणि डॉ. यश पाटील यांची होती. मुख्य मार्गदर्शक अनंत बिराजदार हे होते. सिंगापूर येथून सुनीता रिकामे-ढोले, नेदरलँड येथून किरण पवार यांनी ऑनलाईन पद्धतीने योगाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रीतम कानडे, अर्चना रेमाने, शर्मिला ब्राह्मणे, भाग्यश्री कोते- सस्ते, माधुरी सिनारे, गजेंद्र जाधव, नीलेश इंगुळकर यांनी सहभाग घेतला.
...........
आपली संस्कृती टिकावी, तिचे संवर्धन व्हावे, या हेतूने हा उपक्रम आम्ही राबवला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. विदेशात असलो तरी मराठी संस्कृतीचा अभिमान आहे.
-डॉ. संगीता तोडमल