श्रीरामपूर : रेमडेसिविरचा काळाबाजार प्रकरणात शहर पोलिसांनी गुरुवारी एका मेडिकल दुकानातील नोकराला अटक केली. यापूर्वी अटकेत असलेल्या दोन तरुणांपैकी एक डॉक्टरांकडे वॉर्डबॉय होता. गुन्ह्यात आजअखेर केवळ प्यादे पकडण्यात आल्याची कोरोना पीडित नागरिकांची भावना आहे.
शहर पोलिसांनी गुरुवारी दिनेश उर्फ रेवन्नाथ संजय बनसोडे या मेडिकल दुकानात कामाला असणाऱ्या मुलाला अटक केली. न्यायालयाने त्याला २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेत असलेल्या शुभम श्रीराम जाधव (वय २१, रा.आंबेजोगाई, जि.बीड) व प्रवीण प्रदीप खुने (वय २३, रा.भातंबरी, ता.बार्शी, जि.सोलापूर) यांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपत आहे.
रेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री केल्याप्रकरणी खुने व जाधव यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पकडले होते. ते चार हजार ८०० रुपयांच्या दोन इंजेक्शनची ४० हजार रुपयांना शहरातील एका रुग्णाला विक्री करत होते. त्यांच्याकडे इंजेक्शनचे बिल अथवा डॉक्टरची चिठ्ठी आढळून आली नव्हती.
याप्रकरणी संजय रुपटक्के (रा.मोरगेवस्ती, श्रीरामपूर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात शहरातील एका डॉक्टरकडे आरोपी खुने हा वॉर्डबॉय म्हणून काम करत होता. याच डॉक्टरने इंजेक्शन विक्रीसाठी आपल्याला दिल्याचे खुने याने सांगितले, असे फिर्यादीत स्पष्टपणे म्हटले आहे.
याबाबत तपासी अधिकारी संभाजी पाटील यांना विचारले असता, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. फिर्यादीत कोणत्याही डॉक्टरचा उल्लेख नाही. अटकेतील तरुणांना रेमडेसिविर पुरविणाऱ्या सूत्रधारांचा शोध अद्याप सुरू आहे, असे त्यांनी लोकमतला सांगितले. फिर्यादीत उल्लेख असताना पोलीस संबंधित डॉक्टरचे नाव लपवण्याचा प्रयत्न का करत आहेत हे स्पष्ट होत नाही.
---------
‘त्या’ डॉक्टरची चौकशी
आरोपी खुने याने सांगितल्याप्रमाणे रेमडेसिविरचा पुरवठा करणाऱ्या त्या डॉक्टरची शहर पोलिसांनी चौकशी केली आहे. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. नि:पक्षपातीपणे गुन्ह्याचा तपास सुरू आहे. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांचे तपासाकडे लक्ष आहे. सबळ पुरावे मिळताच दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांनी लोकमतला दिली.
------------
वॉर्डबॉय व नोकराला अटक
या गुन्ह्यात डॉक्टरकडे कामाला असलेला वॉर्डबॉय व मेडिकल दुकानातील नोकराला अटक करण्यापर्यंत तपासात प्रगती झाली आहे. मात्र खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोलिसांची मजल जाणार का? याकडे कोरोना पीडित जनतेचे लक्ष लागले आहे.
--------