वाटाणा ३० रुपये किलो; पारनेर तालुक्याला ६ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:24+5:302021-07-24T04:14:24+5:30
पारनेर : प्रति किलोचा भाव अगदी ३० रुपयांवर आल्याने पारनेर तालुक्यातील वाटाणा उत्पादकांना यंदा ६ कोटी रुपयांच्या आसपास फटका ...

वाटाणा ३० रुपये किलो; पारनेर तालुक्याला ६ कोटींचा फटका
पारनेर : प्रति किलोचा भाव अगदी ३० रुपयांवर आल्याने पारनेर तालुक्यातील वाटाणा उत्पादकांना यंदा ६ कोटी रुपयांच्या आसपास फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
पारनेर शहरासह परिसरातील बुगेवाडी, गोरेगाव, पाडळी, तराळवाडी, पुणेवाडी, सिद्धेश्वरवाडी, चिंचोली, लोणी हवेली, जामगाव, पानोली, कान्हूर पठार भागांतील कान्हूर पठार, करंदी, विरोली, किन्ही, पिंपरी पठार, वेसदरेसह अनेक भागात वाटाणा पिकाचे उत्पादन घेतले जाते. अवघ्या दीड ते दोन महिन्यात उत्पादन निघत असल्याने वाटाणा पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा असल्याचे शेतकरी ऋषिकेश तराळ, भास्कर चौधरी यांनी सांगितले.
यंदा वाटाणा उत्पादन वाढले. मात्र ६० रुपये ते १३० रुपये प्रति किलो विक्री होणारा वाटाणा यंदा ३० ते ३५ रुपयांनी विक्री होत असल्याने शेतकरी आर्थिक दृष्टीने संकटात सापडल्याचे पुणेवाडीचे शेतकरी कारभारी बोरुडे यांनी सांगितले. दोन एकरात वाटाणा उत्पादन घेतले असून ७ ते ८ हजार रुपये खर्च तोडणीपर्यंत आल्याचे त्यांनी सांगितले.
----
दोनशेहून अधिक युवकांना रोजगार
तालुक्यात वाटाणा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. वाटाणा खरेदीसाठी युवक व्यापारी तयारी झाले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून यामध्ये असल्याचे अविनाश ठुबे, अनिकेत रमेश औटी, ज्ञानेश्वर पुजारी, गणेश गुळवे, संतोष औटी, सागर हांडे या युवकांनी सांगितले. खरेदीदार, माल वाहतूक वाहन चालक यासह इतर कामे मिळून २०० ते ३०० जणांना दोन महिने रोजगार उपलब्ध होत आहे.
---वाटाण्याची पुण्या-मुंबईत गोडी...
पारनेर तालुक्यातील हिरव्या वाटाण्याला पुण्या-मुंबईच्या बाजारात मोठी मागणी असते. मागणी चांगली असल्याने शेतकरीही मुगाऐवजी वाटाणा पिकाकडे वळले आहेत, असे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.
----
तीन हजार तीनशे हेक्टरवर पेरणी...
तालुक्यात यंदा ४ हजार ३०० हेक्टरवर वाटाणा पेरणी झाली. वाटाणा उत्पादन चांगल्या प्रमाणात निघत आहे. कान्हूर पठार, पारनेर परिसरात मोठ्या प्रमाणवर उत्पादन निघत आहेत. एकरी २० टन उत्पादन निघत आहे, असे तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी सांगितले.
----
फोटो आहे