पारनेरच्या महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:43+5:302021-08-26T04:23:43+5:30
पारनेर : तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करावी या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठी संघटनांनी बुधवारपासून बेमुदत ...

पारनेरच्या महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू
पारनेर :
तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करावी या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील महसूल कर्मचारी व तलाठी संघटनांनी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ४१ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने तहसील कार्यालयासह तालुक्यातील सर्व तलाठी सजांचे कामकाज ठप्प झाले.
एकतर देवरे यांची बदली करा किंवा आमची तालुक्याबाहेर बदली करा, अशी या आंदोलकांची मागणी असून मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोेलन सुरूच राहणार असल्याचे महसूल संघटनेचे अध्यक्ष महेंद्र रोकडे व तलाठी संघटनेचेे अध्यक्ष एस. यू. मांडगे यांनी सांगितले.
महसूल कर्मचारी व तलाठी संघटनांनी वर्षभरापूर्वी तहसीलदार देवरे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारींची आठवण करून देत देवरे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. बुधवारपासून कर्मचारी व तलाठी संघटनांंनी बेमुदत काम आंदोलनास सुरुवात केली.
निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत, कोविड सेंटर कॅम्पमध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतः केलेला खर्च तहसीलदार देवरे यांनी अदा केलेेला नाही. तहसीलदार देवरे यांचे महिलांविषयी व सर्व कर्मचारी वर्गाविषयीचे दडपशाहीचे धोरण, चुकीचे आहे.
उपोषणकर्ते अरुण आंधळे यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेली माहिती दिली या कारणास्तव महसूल सहाय्यक दिगंबर पवार यांच्याकडील जमीन संकलनाचा कार्यभार आकस बुद्धीने काढून घेण्यात आला. बदली झालेले महसूल सहाय्यक प्रल्हाद सलगरे यांच्याकडील संकलनाच्या संचिका पाहण्यासाठी व स्वाक्षरीसाठी शासकीय निवासस्थानी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्या अद्याप परत करण्यात आलेल्या नाहीत. यापूर्वीच्या संचिका गायब करण्याचा अनुभव पाहता या सर्व संचिकांमधील कागदपत्र तसेच सर्व संचिका गायब करून संबंधित कर्मचाऱ्यांना अडचणीत आणून त्यांची खातेनिहाय चौकशी लावण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याची भीती व्यक्त करून सर्व कर्मचारी मानसिक तणावाखाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
----
२५ पारनेर आंदोलन
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करावी या मागणीसाठी महसूल कर्मचारी, तलाठी संघटनांनी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.