निमगाव खैरी - नाऊर रस्ता आठ दिवसांतच उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:08 IST2021-08-02T04:08:54+5:302021-08-02T04:08:54+5:30

निमगाव खैरी-जाफराबाद-नाऊर या अडीच किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे नुकतेच काम पूर्ण झाले होते. रस्त्याचे उद्घाटन होत नाही तोच काही दिवसांतच ...

The Nimgaon Khairi-Naur road was demolished in eight days | निमगाव खैरी - नाऊर रस्ता आठ दिवसांतच उखडला

निमगाव खैरी - नाऊर रस्ता आठ दिवसांतच उखडला

निमगाव खैरी-जाफराबाद-नाऊर या अडीच किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे नुकतेच काम पूर्ण झाले होते. रस्त्याचे उद्घाटन होत नाही तोच काही दिवसांतच ठिकठिकाणी हा रस्ता खचला असून आता या रस्त्याची पुन्हा डागडुजी सुरू करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाची फसवणूक केल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ तरस यांच्यासह सुनील दातीर व शैलेश खाटेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अडीच किमीच्या रस्त्यासाठी ४४ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली होती. रस्ता दुरुस्तीनंतर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, तसेच रस्ता अनेक ठिकाणी खचलादेखील असून या रस्त्याच्या कामाला डांबर अतिशय कमी वापरण्यात आले आहे. हा रस्ता दोन तालुक्यांना जोडणारा प्रमुख मार्ग असून, रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. या कामाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ तरस यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Web Title: The Nimgaon Khairi-Naur road was demolished in eight days