न्यू आर्टस महाविद्यालयाला आता स्वायत्त दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST2021-02-23T04:32:33+5:302021-02-23T04:32:33+5:30

अहमदनगर : येथील जिल्हा मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस्, काॅमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयास ुपुढील दहा वर्षांसाठी स्वायत्त ...

New Arts College now has autonomous status | न्यू आर्टस महाविद्यालयाला आता स्वायत्त दर्जा

न्यू आर्टस महाविद्यालयाला आता स्वायत्त दर्जा

अहमदनगर : येथील जिल्हा मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस्, काॅमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयास ुपुढील दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यास मान्यता दिली असून, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी दिली.

स्वायत्त दर्जाबाबत माहिती देण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. भास्करराव झावरे आदी उपस्थित होते. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरून महाविद्यालयाने शैक्षणिक स्वायत्तेकरिताचा प्रस्ताव २९ ऑक्टोबर २०२० रोजी पुणे विद्यापीठाकडे पाठवला होता. विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने हा प्रस्ताव शिफारशींसह मान्यतेसाठी यूजीसीकडे पाठवला. महाविद्यालयाचे असलेले ए प्लस प्लस नॅक मूल्यांकन, शैक्षणिक कामगिरी, पायाभूत सुविधा, शिक्षकांची गुणवत्ता, अभ्यासपूरक कामगिरी याची दखल घेऊन ११ फेब्रुवारी रोजी यूजीसीने महाविद्यालयास स्वायत्त दर्जा दिला.

विद्यापीठाच्या धर्तीवर महाविद्यालयाच्या कामकाजाची देखरेख करण्यासाठी व कार्यवाहीकरिता नियामक मंडळ, विद्या परिषद, अभ्यास मंडळ, वित्त समितीसारख्या संविधानिक समित्या स्थापन करण्याचा अधिकार प्राप्त होईल. महाविद्यालयास आपल्या अभ्यासक्रमात कालसुसंगत बदल करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देईल. शिवाय कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रम व मूल्यशिक्षण याद्वारे समाजाभिमुख नागरिक घडविण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती अध्यक्ष झावरे व प्राचार्य झावरे यांनी दिली.

------------

परीक्षा व निकालही महाविद्यालयातच

स्वायत्तता मिळाल्यामुळे यापुढे महाविद्यालयास पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, मूल्यांकनाच्या पद्धती ठरवणे, परीक्षा घेणे व निकाल जाहीर करणे आदींचे अधिकार मिळाले आहेत. पूर्वी याच कामांसाठी विद्यापीठावर अवलंबून राहावे लागत असे. त्यात बराच वेळ खर्ची पडत होता. हा वेळ यामुळे वाचणार असून, ज्या अभ्यासक्रमांना व्यावसायाभिमुख मागणी आहे, असे अभ्यासक्रम महाविद्यालय स्वत: तयार करेल व अभ्यासात आणता येणार आहेत.

Web Title: New Arts College now has autonomous status