राष्ट्रवादी देणार राज्यातील ४५० निराधारांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:27+5:302021-07-24T04:14:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाकाळात अनेक मुला-मुलींच्या पालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरात अनेक मुलांवर निराधार होण्याची वेळ आली ...

NCP will provide support to 450 homeless people in the state | राष्ट्रवादी देणार राज्यातील ४५० निराधारांना आधार

राष्ट्रवादी देणार राज्यातील ४५० निराधारांना आधार

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनाकाळात अनेक मुला-मुलींच्या पालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरात अनेक मुलांवर निराधार होण्याची वेळ आली आहे. या निराधार मुला-मुलींना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे राष्ट्रवादी जिवलग हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातून राज्यभरात ४५० निराधार मुला-मुलींना दादा, मामा, काका, ताई, आक्का, काकू, मामी मिळणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य सचिव नित्यश्री नागरे यांनी दिली.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी नुकतीच नागरे यांची निवड करण्यात आली. त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीनंतर नागरे प्रथमच नगरमध्ये आल्या असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, कोरोनाकाळात राज्यात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला. यात काही मुला-मुलींवर अनाथ होण्याची वेळ आली. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या अनाथ मुला-मुलींना भेटत आहोत. अनेकांची दयनीय अवस्था समोर येत आहे. काही मुला-मुलींनी त्यांच्या इतर नातेवाइकांकडे आश्रय घेतला आहे. मात्र, काही मुलं-मुली पूर्णपणे निराधार झाले आहेत. अशी मुलं-मुली शोधून त्यांना आधार देणाऱ्या राष्ट्रवादी जिवलग या उपक्रमाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यभरात अशी सुमारे ४५० मुले-मुलींची नावे आमच्यापर्यंत आली आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी एका अनाथ मुला-मुलीचे पालकत्व घेतले आहे. या मुला-मुलींना आम्ही आधार देणार आहोत. वेगवेगळ्या सुविधा पुरविणार आहोत, तसेच त्यांना मायेची उब देत मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देणार आहोत, असे नागरे यांनी सांगितले.

..........................

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार सुप्रिया सुळे यांनी या उपक्रमाची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली युवती पदाधिकाऱ्यांनी अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारले आहे.

-नित्यश्री नागरे, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी युवती काँग्रेस

Web Title: NCP will provide support to 450 homeless people in the state